क्रेडिट कार्ड वापरताय? हे नियम माहित असू द्या

मुंबई : क्रेडिट कार्ड म्हणजे कितीही पैसे खर्च करण्याची मुभा, असे अनेकांना वाटते. शॉपिंगला जायचे, हॉटेलमध्ये जायचे, हवा तेवढा खर्च करावा आणि त्यासाठी केवळ एक स्वाईप आणि बस्स झालं. त्यासाठी पगार व्हायची वाट बघावी लागत नाही. वाटेल तेव्हा आपण खर्च करु शकतो. क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर सुरुवातीला सर्वांना असंच वाटतं. पण खरी गंमत तर तेव्हा सुरु …

क्रेडिट कार्ड वापरताय? हे नियम माहित असू द्या

मुंबई : क्रेडिट कार्ड म्हणजे कितीही पैसे खर्च करण्याची मुभा, असे अनेकांना वाटते. शॉपिंगला जायचे, हॉटेलमध्ये जायचे, हवा तेवढा खर्च करावा आणि त्यासाठी केवळ एक स्वाईप आणि बस्स झालं. त्यासाठी पगार व्हायची वाट बघावी लागत नाही. वाटेल तेव्हा आपण खर्च करु शकतो. क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर सुरुवातीला सर्वांना असंच वाटतं. पण खरी गंमत तर तेव्हा सुरु होते जेव्हा कार्डचं बिल भरावं लागतं, दिलेल्या मुदतीत हे बिल न भरल्यास एवढा दंड असतो की, क्रेडिट कार्ड तुम्हाला नकोसं वाटतं.

क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जातात, अनेक नियम असतात जे ग्राहकांना माहितच नसतात, किंबहुना जाणीवपूर्वक ते लपवले जातात. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी त्याबाबतची सर्व माहिती जाणून घ्या, मगच क्रेडिट कार्डचा वापर करा.

वार्षिक शुल्क आणि इतर चार्जेस

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या पहिल्या वर्षीचं वार्षिक शुल्क माफ करत मोफत क्रेडिट कार्ड देतात. मात्र हे केवळ एका वर्षापुरतंच असतं. त्यानंतर कार्डचा प्रकार आणि क्रेडिट लिमिटनुसार 500 ते 3000 पर्यंतचं शुल्क आकारलं जातं.

रिव्हॉलव्हिंग इंटरेस्ट रेट्स

देय तारखेपर्यंत कार्डवरील शिल्लक राशीची परतफेड न केल्यास दर महिन्याला 1.99 % ते 4.00 % च्या दराने व्याज भरावे लागू शकते. हे व्याज कमी वाटत असलं तरी हे वार्षिक व्याजदर (एपीआर) च्या हिशेबाने 24% ते 48% होते.

ओव्हरड्राफ्ट मर्यादेवरील शुल्क

क्रेडिट लिमिटपेक्षा अधिक खर्च केल्यानंतर बँकेकडून याचे शुल्क आकारले जाते. साधारणपणे ओव्हरड्राफ्ट मर्यादेवर एक निश्चित शुल्क आकारले जाते.

विलंब शुल्क

ग्राहकाने क्रेडिट कार्डचे महिन्याचे शुल्क निश्चित वेळी भरले नाही तर त्याच्याकडून विलंब शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरावयाच्या रकमेच्या काही टक्के असू शकते.

वस्तू आणि सेवा कर (GST)

क्रेडिट कार्डचे शुल्क, व्याज आणि इतर चार्जेसवरही 18 टक्के जीएसटी आकारला जातो.

आउटस्टेशन चेक शुल्क

ग्राहक त्याच्या नोंदणीकृत शहराच्या बाहेरहून क्रेडिट कार्डचे बिल भरत असेल, तर त्या रकमेनुसार निश्चित टक्के सेवा शुल्क आकारले जाते.

डुप्लीकेट स्टेटमेंटवरील शुल्क

बहुतांश क्रेडिट कार्ड कंपन्या डुप्लीकेट स्टेटमेंट करिता शुल्क आकारतात.

परकीय चलन व्यवहार

विदेशी चलनात व्यवहार करताना किंवा विदेशी चलन भारतीय चलनाशी बदलताना तुमच्या संबंधित कार्ड कंपनी (मास्टर/व्हिजा) च्या दरांच्या नियमांनुसार शुल्क आकारले जाते.

क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याचं शुल्क

क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढल्यावरही शुल्क आकारले जाते. यासाठी त्या रकमेचा काही टक्के भाग शुल्क म्हणून आकारला जातो.

पेट्रोल आणि रेल्वे तिकिटावरील शुल्क

क्रेडिट कार्डने पेट्रोल आणि रेल्वे तिकीट विकत घेतल्यास त्यावरही एक निश्चित शुल्क आकारलं जातं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *