
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोगाने (NCISM) सदस्य पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतीय औषध प्रणालीमध्ये (ISM) सुधारणा करण्यासाठी आणि वैद्यकीय संस्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांची ही निवड केली जाणार आहे. सरकारी सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण ६ सदस्य पदे भरली जाणार आहेत. ही पदे आयोगाच्या दोन महत्त्वाच्या मंडळांमध्ये विभागली गेली आहेत. यातील वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग बोर्ड यामध्ये ३ सदस्य पदे आहेत. हे मंडळ वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकन, मानांकन आणि नवीन संस्थांना परवानगी देण्याचे काम करते. तर नीतिमत्ता आणि नोंदणी मंडळ यामध्ये ३ सदस्य पदे आहेत. हे मंडळ वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता, डॉक्टरांची नोंदणी आणि व्यावसायिक आचरणाचे नियमन करते.
या सहा पदांपैकी ३ पदे केवळ आयुर्वेद तज्ज्ञांसाठी राखीव आहेत. उर्वरित ३ पदे आयुर्वेद, युनानी, सिद्धा किंवा सोवा-रिग्पा यांपैकी कोणत्याही भारतीय औषध प्रणालीतील तज्ज्ञांसाठी खुली आहेत. उमेदवारांची निवड करण्यासाठी कडक शैक्षणिक आणि अनुभवाचे निकष लावण्यात आले आहेत.
या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून भारतीय वैद्यकीय प्रणालीशी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (MD/MS) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे वैद्यकीय क्षेत्रात एकूण १५ वर्षांचा अनुभव असावा. यापैकी किमान ७ वर्षांचा अनुभव हा भारतीय वैद्यकीय प्रणालीमध्ये आरोग्य प्रशासन किंवा शिक्षणाच्या विकासाशी संबंधित असणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे नाव राज्य वैद्यकीय परिषद, केंद्रीय परिषद किंवा NCISM च्या अधिकृत नोंदणी पुस्तकात असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ६४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयाची गणना ३० मार्च २०२६ या तारखेनुसार केली जाईल. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे. यासाठी उमेदवारांनी आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा. तो भरून आवश्यक कागदपत्रांसह सचिव, आयुष मंत्रालय, आयुष भवन, बी-ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स आयएनए, नवी दिल्ली – ११००२३, या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.