Interview Tips : जॉब इंटरव्ह्यू पूर्वी या टिप्स लक्षात ठेवाल तर नोकरी मिळालीच म्हणून समजा !
इंटरव्ह्यू दरम्यान काही छोट्या-छोट्या टिप्स फॉलो केल्यास नोकरी मिळण्यास मदत होऊ शकते. त्या टिप्स कोणत्या हे जाणून घेऊया.

Image Credit source: freepik
Interview Tips : नोकरी (Job) मिळवण्याच्या मार्गात मुलाखत अर्थात इंटरव्ह्यू (interview) हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इंटरव्ह्यूसाठी तयारी करताना बहुतांश उमेदवार हे नोकरीशी संबंधित कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात. पण जे प्रश्न इंटरव्ह्यू दरम्यान विचारले जातात, आणि ज्याकडे अधिक लक्ष दिले जाते, त्यांच्याकडे बऱ्याच जणांचे दुर्लक्ष होते. इंटरव्ह्यू दरम्यान याच या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीवर तुमची चुकीची छाप पडू शकते.
इंटरव्ह्यू दरम्यान बेसिक प्रश्नांपासून ते पोशाख कसा असावा, तसेच कंपनीबाबत रिसर्च करणे अशा अनेक बाबींवर ध्यान देणे महत्वाचे ठरते. या टिप्स जरूर लक्षात ठेवा.
- तुम्ही ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात, ती कंपनी कोणत्या प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करते, कंपनीचे रेकॉर्ड कोणते आहेत, कंपनीचा इतिहास काय आहे, या सर्वांबद्दल माहिती गोळा करा. मुलाखती दरम्यान, तुम्ही ज्या कंपनीत काम करणार आहात त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे हेही विचारले जाऊ शकते.
- इंटरव्ह्यू दरम्यान काही बेसिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा – तुमच्या स्वत:बद्दलची माहिती, तुम्ही आधी जिथे काम केलं होतं तेथील जबाबदाऱ्या यांबद्दल तसेच नवीन कंपनीत काम करताना काय अपेक्षा आहेत, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे असे प्रश्न समोर आले तर काय उत्तर द्यायची याची तयारी करा.
- इंटरव्ह्यूला जाताना चांगला, नीटनेटका पोशाख करून जा. औपचारिक म्हणजेच फॉर्मल कपडे घालावेत. सोबर रंगाची निवड करा. स्त्रियांनी कमीत कमी दागिने घालावेत , पुरूषांनी ग्रूमिंग टिप्स फॉलो कराव्यात.
- इंटरव्ह्यू साठी दिलेल्या वेळेआधीच पोहोचावे. वेळ पाळणारी माणसं सर्वांनाच आवडतात, तुमचे इंप्रेशनही चांगले पडते. तसेच यामुळे तुम्हाला सेटल होण्यास वेळ मिळेल. व मुलाखतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार होऊ शकता.
- इंटरव्ह्यू दरम्यान तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील , त्याची उत्तरे संपूर्ण आत्मविश्वासाने द्यावीत. सकारात्मक विचार दिसावेत. तुमचे संपूर्ण लक्ष मुलाखतीवरच ठेवावे.
- जे काही प्रश्न विचारले जातील, त्यामुळे घाबरू नका. प्रश्न नीट ऐकून उत्तरे द्यावीत. पण लगेचच, भडाभडा बोलू नका. प्रश्न ऐकून, त्यावर विचार करून, काही सेकंदांचा पॉझ घेऊन उत्तरे द्यावीत. रिलॅक्स राहिलात तर इंटरव्ह्यू उत्तम जाईल.
- इंटरव्ह्यू म्हणजे फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे नव्हे. उमेदवार हे इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीलाही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे एक-दोन तरी प्रश्न विचारा. यावरून तुम्ही किती अलर्ट आहात, हे समजते.
- इंटरव्ह्यू झाल्यावर रूममधून बाहेर पडताना, इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचे नीट व सकारात्मक दृष्टीने आभार माना. इंटरव्ह्यूसाठी एचआर मॅनेजरचे आभार मानू शकता. त्यांना ईमेल पाठवू शकता.
