
प्यार में कुछ सही गलत नहीं होता.. असं म्हणत अनेक प्रेमवीर आपल्या प्रेमासाठी, आवडत्या व्यक्तीसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. पण काही जण तर असं एखादं कृत्य करतात की एखाद्याचं आयुष्यच पणाला लागू शकतं. असाच एक प्रकार कर्नाटकमध्ये घडला. तेथील चिकमंगळूर येथे 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, पतीच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या बायकोने हाय खाल्ली, रडत रडत ती शोक करू लागली. मात्र त्यानंतर तजे सत्य समोर आलं, त्याने सगळेच चक्रावले. कारण ज्या पतीच्या वियोगापायी त्याची पत्नी रडत होती, तिनेच आपल्या पतीचा काटा काढला होता आणि तेही तिच्या 33 वर्षांच्या प्रियकरासाठी… नेमकं काय घडलं ?
सुब्रमण्यम (वय 60) असे मृत इसमाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी, मीनाक्षम्मा (वय 56) आणि तिचा 33 वर्षांचा प्रियकर प्रदीप तसेच त्याच्या दोन मित्रांना विश्वास आणइ सिद्धेशला अटक केली. सगळेजण कदूरचे रहिवासी आहेत. मृत सुब्रमण्यम हे टेलर म्हणून काम करत होते. सोमवारी मीनाक्षम्माला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी मीनाक्षम्माने कदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की तिचा पती सुब्रमण्यम 31 मे रोजी बाहेर गेला होता आणि घरी परतला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र तपासात भयानक सत्य समोर आलं.
तपासले सीसीटीव्ही
यानंतर, पोलिसांनी सुब्रमण्यम यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रॅक केले. 3 जून रोजी रेल्वे पोलिसांनी कदूर पोलिसांना कळवले की ट्रॅकवर अर्धा जळालेला पाय आढळला आहे. नंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून उर्वरित मृतदेह ताब्यात घेतला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, 31 रोजी, टेलर असलेले सुब्रमण्यम हे त्याच्या दुकानाजवळ कारमध्ये बसताना दिसले, त्यावेळी प्रदीप, सिद्धेश आणि विश्वास हेही सोबत दिसले.
आम्ही तिघांना ताब्यात घेतले, असे तपासात सहभागी असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्या तिघांची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. 8 जून रोजी आम्ही त्यांना न्यायालयात हजर केले आणि त्यांची अटक नोंदवली. प्रदीप आणि मीनाक्षीम्मा यांचे संबंध होते असे तपासाता आम्हाला आढळं पण, परंतु ते सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही असे पोलिसांनी नमूद केलं.
पतीच्या मृत्यूनंतर मीनाक्षम्माने फोडला हंबरडा
पतीच्या मृत्यूची बातमी मीनाक्षम्मा खूप रडत होती. सुरुवातीला आम्हाला तिच्यावर संशय आला नाही, परंतु जेव्हा आम्ही प्रदीप आणि त्याच्या मित्रांची आमच्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा तिचा या प्रकरणात सहभाग उघडकीस आला असे पोलिसांनी सांगितलं. मात्र, प्रदीपच्या जबाबाव्यतिरिक्त, तिला अटक करण्यासाठी आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आम्ही मीनाक्षम्माची अनेक वेळा चौकशी केली, परंतु त्यावेळी त्या हत्येत आपला काहीच सहभाग नाही असे सांगत कोणातही संबंध नाकारला.
मीनाक्षम्मा आणि प्रदीप यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासण्यात आले, मात्र गेल्या सहा महिन्यांत त्यांनी एकही फोन कॉल केलेला नाही. तथापि, पोलिसांच्या लक्षात आले की मीनाक्षम्मा वारंवार एका नंबरवर कॉल करत होती आणि मेसेज करत होती. नंबरची ओळख न काढताच समजलं की तो नंबर प्रदीपच्या आईच्या नावाने रजिस्टर्ड आहे. तांत्रिक तपासणीत असे दिसून आले की प्रदीप ते सिम कार्ड वापरत होता. यामुळे अखेर या खून प्रकरणाचे गूढ उकलले.
सुनसान जागी नशेत कापला गळा
31 मे रोजी प्रदीप आणि इतर आरोपींनी सुब्रमण्यम यांच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर आरोपी सुब्रमण्यम यांच्या दुकानात गेले आणि त्यांना गाडीत बसवले. त्यानंतर साक्रेपटनाजवळील एका निर्जन ठिकाणी सर्वांनी एकत्र दारू प्यायली. त्यानंतर, दारूच्या नशेत असलेल्या प्रदीपने सुब्रमण्यम यांचा गळा चिरला. नंतर, आरोपींनी त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णपणे जळाला नाही. अखेर ते तो मृतदेह तिथेच सोडून पळून गेले.
म्हणून पत्नीने काढला पतीचा काटा
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या पतीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतरच मीनाक्षम्मा यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मीनाक्षम्मा आणि सुब्रमण्य यांना दोन मुली आहेत. त्यांचं लग्न झालं आहे, मीनाक्षम्मा आणि सुब्रमण्यम यांना नातवंडही आहेत. चार वर्षांपूर्वी मीनाक्षम्मा हिची प्रदीपशी ओळख झाली , तोही टेलर होता. पाहता पाहता त्यांनी मैत्री गाढ झाली आणि दोघे प्रेमात पडले. जेव्हा तिचा पती सुब्रमण्यमला हे कळले तेव्हा त्याने त्यांच्या नात्याला विरोध केला. प्रदीपसोबतच्या नात्यात पती अडथळा ठरू नये म्हणून मीनाक्षम्माने प्रियकराच्या, प्रदीपच्या मदतीने पतीचा काटा काढून त्याला संपवलं.