Ahmednagar Crime : पती-पत्नीचा वाद झाला, मग निर्दयी पित्याने थेट मुलांना दिला अत्यंत वाईट मृत्यू, अंगाचा उडेल थरकाप
पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादाने भयंकर रुप धारण केले. मग पुढे जे घडले त्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
![Ahmednagar Crime : पती-पत्नीचा वाद झाला, मग निर्दयी पित्याने थेट मुलांना दिला अत्यंत वाईट मृत्यू, अंगाचा उडेल थरकाप Ahmednagar Crime : पती-पत्नीचा वाद झाला, मग निर्दयी पित्याने थेट मुलांना दिला अत्यंत वाईट मृत्यू, अंगाचा उडेल थरकाप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/07160222/nagar-children-murder.jpg?w=1280)
अहमदनगर / 7 ऑगस्ट 2023 : बाप या शब्दालाच काळिमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात घडली आहे. या घटनेत चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी बापाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ क्षिरसागर असे आरोपी पित्याचे नाव आहे. मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नराधम बापाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंती सर्व माहिती उघड होईल.
काय घडलं नेमकं?
कर्जत तालुक्यातील आळसुंदे गावात आरोपी गोकुळ क्षिरसागर हा पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. गोकुळ मजुरीचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गोकुळ आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी घरगुती कारणातून भांडण होत असे. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून संतापाच्या भरात गोकुळने घरापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीजवळ आपली 8 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाच्या मुलाला घेऊन गेला आणि पाण्यात फेकून दिले. यात मुलांचा बुडून मृत्यू झाला.
यानंतर आरोपीने स्वतःच गावातील नातेवाईकांना आपण मुलांना विहिरीत फेकून दिल्याची माहिती दिली. यानंतर नातेवाईक आणि गावकरी विहिरीकडे धावले. तसेच कर्जत पोलिसांनाही तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मुलांना तात्काळ अॅम्बुलन्सने उपडिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले.
कर्जत पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून, पोलीस त्याची चौकशी करत आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद होत होता, हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस चौकशीनंतर वादाचे कारण स्पष्ट होईल.