Dombivali Crime : फेरीवाला बनून इमारतीत रेकी करायचा, मग संधी साधून लूट करुन पसार व्हायचा !
डोंबिवलीत चोरीचे सत्र सुरुच आहे. कधी गर्दीचा फायदा घेत तर कधी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरटे संधी साधतात.

डोंबिवली / 11 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत चोरीच्या थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. रामगनर परिसरात नुकतीच चोरीची घटना उघडकीस आली आहे. फेरीवाला बनून परिसरात आधी रेकी करायचा, मग बंद घर हेरुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सूरज ऊर्फ गोल्डी पटिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच हा चोरटा तुरुंगातून सुटून आला होता. तुरुंगातून सुटताच पुन्हा त्याने चोरीचा धंदा सुरु केला. त्याच्यावर आधीच तीन-चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चोरट्याकडून लुटलेला ऐवज हस्तगत केला आहे.
फेरीवाल्याच्या वेशात फिरुन रेकी करायचा
आरोपी सूरज हा सोसायट्या आणि चाळींमध्ये जुन्या कपड्यांवर भांडी देणाऱ्या भांडीवाल्याच्या वेशात फिरायचा. फेरीवाला बनून परिसरात रेकी करायचा. मग बंद घर हेरुन संधी मिळताच फोडायचा आणि ऐवज लंपास करायचा. डोंबिवलीतील रामनगर परिसरातील शामराव विठ्ठल बँकेजवळ सावरकर रोड येथे एका बंद घरात चोरीची घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरुन पोबारा केला.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरट्याला अटक
घरातील सदस्य जेव्हा घरी परतले तेव्हा ही बाब उघडकीस आली. यानंतर रामनगर पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या. चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस हवालदार सचिन भालेराव, लोखंडे, कोळेकर, सरनाईक, राठोड आणि अन्य 3 पोलीस हवालदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. चोरट्यासोबत आणखी कुणी साथीदार सहभागी होता का याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
