राज्यात चाललंय तरी काय? मोहरी टाकून वृद्धाच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ
Witchcraft Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. एका व्यक्तीने त्यांच्या नातेवाईकाच्या घरासमोर मोहरी टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवर येत हेल्मेट घालून त्याने मोहरी टाकली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. N 7 परिसरातील आयोध्यानगर भागात राहणार्या एका कुटुंबियांच्या अंगणात एका व्यक्तीने पांढरी मोहरी टाकून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदरील व्यक्ती हा दुचाकी वर हेल्मेट घालून आला होताय त्यावेळी हेल्मेट न काढताच त्याने घराच्या अंगणात पांढरी मोहरी टाकली.
या प्रकारामुळे भयभीत झालेल्या कुटुंबियांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा आरोपी कुटुंबियांच्या नात्यातीलच व्यक्ती असल्याची माहिती समोर आली. गजानन शेकोकार असं या आरोपीचं नाव असून तो बँकेत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी त्याचबरोबर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतत करत होता असा प्रकार
सुभाष पिंजरकर यांनी याविषयीची तक्रार दिली आहे. त्यानुसार ते अयोध्यानगरीत कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या घरासमोर ओट्यावर पांढरी मोहरी दिसली. गेल्या तीन शनिवारपासून हा प्रकार घडत होता. या प्रकारामुळे पिंजरकर कुटुंबिय धास्तावले होते. 10 जून रोजी रात्री 11 वाजता सुभाष पिंजरकर कुटुंबिय झोपले. निजानीज झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने पांढरी मोहरी फेकली. दुसर्या दिवशी पिंजरकर कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घराशेजारील रामराव काकडे यांच्या सीसीटीव्हीत हा प्रकार कोण करत आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी हेल्मेट घातलेली एक व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या घराच्या ओट्यावर पांढरी मोहरी फेकत असल्याचे कैद झाले. या दुचाकीचा क्रमांक (MH 20 BE 8092) कैद झाला.
आरटीओ ॲपमध्ये दुचाकीचा क्रमांक टाकल्यावर खरा प्रकार समोर आला. ही व्यक्ती पिंजरकर यांचा नातेवाईक असल्याचे समोर आले. गजानन काशीराम शेकोकार ही ती व्यक्ती अस्लयाचे समोर आले. शेकोकार हा बाबा पेट्रोल पंपाजवळील म्हाडा कॉलनीत राहतो. इतकेच नाही तर पिंजरकर यांचे दुसरे नातेवाईक ज्योती श्रीरंग वाढेकर यांच्या घरासमोर सुद्धा अशीच पांढरी मोहरी टाकल्याची बाब समोर आली. स्थानिक सीसीटीव्हीत हीच दुचाकी आढळली.
