चोर समजून तरुणाला मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू, कुठे घडली धक्कादायक घटना?

दारुच्या नशेत एक तरुण एका हायप्रोफाईल इमारतीत घुसला. लोकांना वाटले चोर घुसला. मग वॉचमनसह इमारतीतील लोकांनी तरुणासोबत भयंकर कृत्य केले.

चोर समजून तरुणाला मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू, कुठे घडली धक्कादायक घटना?
चोर समजून तरुणाला मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 27, 2023 | 9:46 AM

मुंबई : मुंबईच्या बोरिवली पूर्व भागात असलेल्या एका हायप्रोफाईल इमारतीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्री दारूच्या नशेत इमारतीत घुसलेल्या तरुणाचा लोकांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनाच्या आधारे विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी 2 वॉचमनसह 5 जणांना अटक केली आहे. मृत व्यक्ती हा पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीण शांताराम लहाने असे 29 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. मृत प्रवीणचा भाऊ प्रकाश लहाने हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

चोर समजून तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी रात्री 1.18 वाजण्याच्या सुमारास कार्टन रोड क्रमांक 5 येथील शशी सोसायटीमध्ये तरुणाला पकडण्यात आल्याचा फोन पोलीस कंट्रोलला आला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत इमारतीतील काही लोक आणि इमारतीचा चौकीदार यांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिस तेथे पोहोचल्यानंतर लोकांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

प्रवीणच्या मृत्यूनंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 6 जणांविरुद्ध कलम 304(2), 143, 144, 147, 148, 149 आयपीसी, 37(1)(अ), 135 आणि सोसायटीचे 2 वॉचमन जोरा सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इमारतीचे वॉचमन जलराम भट्ट आणि जनक मोतीराम भट्ट यांच्यासह स्थानिक रहिवासी हर्षित गांधी, मनीष गांधी आणि हेमंत राम्बिया यांना अटक करण्यात आली आहे.

तरुण दारुच्या नशेत इमारतीत गेल्याचे उघड

प्रवीण लहाने हा चोर नसून, तो नाशिकचा रहिवासी आहे. दारूच्या नशेत तो सोसायटीत गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चोर आल्याचा आरडोओरडा करत सोसायटीतील लोकांनी जमवले आणि मारहाण करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रवीणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली.