भांडुप येथे शाळकरी मुलीला इंजेक्शन दिल्याच्या आरोपाने खळबळ, काय आहे नेमके प्रकरण ?
बदलापूर येथील एका प्रतिष्ठीत शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भांडुप येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका नऊ वर्षांच्या मुलीला निर्जन स्थळी नेऊन इंजेक्शन दिल्याचा आरोप पालकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

भांडुपमध्ये नऊ वर्षांच्या शाळकरी मुलीला शाळेच्या आवारात एका निर्जन ठिकाणी नेऊन इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सीसीटीव्हीत काहीही दिसले नसल्याने या प्रकरणाचा आणखी खोलात जाऊन तपास केला जात आहे. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी काहीही बोलण्यास नकार दिला असल्याने प्रकरणाचे गुढ वाढले आहे. अलिकडेच बदलापूर येथे दोघा शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
बदलापूरातील एका प्रतिष्ठीत शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने देशभर खळबळ उडाली होती. या मुलींवरील तक्रार शाळा प्रशासनाच्या दबावाने शेवटपर्यंत पोलिसांनी नोंदवून घेतली नव्हती. अखेर मनसेने हा विषय लावून धरल्यानंतर अखेर सरकार आणि पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले होते. बदलापूर येथील शाळेत सीसीटीव्ही देखील नसल्याचे उघडकीस आले होते. आता भांडुप येथील एका शाळेत एका नऊ वर्षांच्या मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिला इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्या पालकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी इंजेक्शन दिल्यानंतर बेशुद्ध पडल्याचाही आरोप तिच्या पालकांनी भांडुप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.




मुलगी एका खाजगी रुग्णालयात दाखल
या मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भांडुप पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आणि मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. परंतु पोलिसांना या सर्व प्रकारावर संशय व्यक्त केला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. ३१ जानेवारी रोजी मुलगी शाळेच्या मैदानावर खेळत असताना ही घटना घडल्याचा तिच्या पालकांनी म्हटले आहे. ही मुलगी भांडुपमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. या कथित घटनेनंतर मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे या मुलीच्या सर्व संबंधित चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुलीने आणि तिच्या पालकांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.पोलिसांनी CCTV च्या माध्यमातून तपास केला आहे, परंतू काहीच धागेदोरे सापडलेले नाहीत. अद्याप याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे म्हटले जात आहे.