VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या

समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी पतीने घरी चक्क तलवारीने केक कापला (Aurangabad Husband Cake Cutting by Sword)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 12:14 PM, 3 May 2021
VIDEO | बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या
तलवारीने केक कटिंग

औरंगाबाद : बायकोसमोर फुशारकी मारण्याचा सोस नवऱ्याच्या चांगलाच अंगलट आला. औरंगाबादमधली तरुणाने लग्नाच्या वाढदिवशी चक्क तलवारीने केक कापण्याचा ‘पराक्रम’ केला. मात्र याची खबर पोलिसांना लागताच मिजासखोर नवरोबाला बेड्या पडल्या आहेत. (Aurangabad Husband arrested for Cake Cutting with wife by Sword on Marriage Anniversary)

सराईत आरोपी दीपक सरकटे याच्या लग्नाचा नुकताच वाढदिवस झाला. अॅनिव्हर्सरीला बायकोसमोर फुशारकी मारण्याची हुक्की त्याला आली. त्यामुळे समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्याने चक्क तलवारीने केक कापला. कुटुंबीयांच्या समोरच बायकोसोबत त्याने तलवारीने केक कटिंग केले. या प्रकाराचा व्हिडीओही शूट करण्यात आला होता.

तलवारीने केक कापून दहशत निर्माण करणे दीपकला चांगलेच महागात पडले. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी औरंगाबादमधील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. काही तासांतच केक कापणाऱ्या पतीला अटक करण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

पुण्यात बर्थडे बॉयला बेड्या

सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील गणेश पेठ परिसरात पोलिसांनी अटक केली. समीर अनंत ढमाले (27) याने भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली होती.

डीजेच्या दणदणाटात तलवारीने केक कटिंग

दुसरीकडे, रोहन बेल्हेकर नावाच्या तरुणाने गेल्या वर्षी धुमधडाक्यात डीजेच्या दणदणाटात वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा होत असताना रोहन बेल्हेकर याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाढदिवस करताना तलवारीसारख्या घातक हत्याराचा वापर केला आणि गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, म्हणून पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक

(Aurangabad Husband arrested for Cake Cutting with wife by Sword on Marriage Anniversary)