हॉटेलमध्ये रचला संतोष देशमुख हत्येचा कट, त्या दिवशी हॉटेलमध्ये नेमके काय घडले?
केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही पुढेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत. त्यामुळे आरोपी किती वाजता आले होते, कुठे बसले होते आणि किती वेळ बसले होते? याबाबतची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली नाही.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हॉटेलमध्ये बसून रचण्यात आला. पोलिसांच्या तपासात ही नवीन माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस सरळ त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहचले. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाले. 20 दिवसांपेक्षा जुने बॅकअप नसल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही पुढेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत. खंडणी आणि खुनाच्या या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची हॉटेलमध्ये तपासणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून 9 डिसेंबर रोजी खून करण्यात आला होता. तत्पूर्वी या घटनेतील आरोपींनी 8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील तिरंगा धाबा या हॉटेलमध्ये बसून हा सगळा कट रचल्याचे समोर आले आहे. हॉटेलमध्ये केलेल्या नियोजनानुसार 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला.
चार दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्यांनी या हॉटेलला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही पुढेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत. त्यामुळे आरोपी किती वाजता आले होते, कुठे बसले होते आणि किती वेळ बसले होते? याबाबतची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली नाही. परंतु आरोपींनी तिरंगा धाब्यावर बसून संतोष देशमुख यांच्या खुनाचा कट रचल्याचे आता पुढे आले आहे.




हॉटेल मालक काय म्हणतात…
हॉटेल मालक तिरंगा धाबा बाबुराव शेळके यांनी सांगितले की, आमच्याकडे जेवण चांगले मिळते म्हणून मोठ्या संख्येने ग्राहकांची गर्दी नेहमीच असते. या गर्दीत 8 डिसेंबरला कोण आले होते? या ठिकाणी काय झाले, हे आम्हाला माहीत नाही. परंतु चार दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी आले होते. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र त्या घटनेस 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही.
दरम्यान, या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा विनंती केली आहे. ते म्हणाले, माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की यामधला एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठे शेडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे. हे सगळी संपले पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातील आरोपी एकच आहे.