Luteri Dulhan : तेवीसव्या वर्षी तिचे 25 पती, अनुराधा असं जाळं टाकायची की…अजब कांड समोर येताच खळबळ!
सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. अवघ्या 23 वर्षे वय असलेल्या अनुराधाचे तब्बल 25 लग्न झाले आहेत. लग्नासाठी मुलीच्या शोधात असलेल्या तरुणांना ती गाठायची आणि नंतर असं काही करायची, की सगळेच अवाक होऊन जायचे.

Crime News : लग्न हे अतिशय पवित्र असे बंधन असते. एकदा लग्नबंधनात अडकल्यावर पती-पत्नी एकमेकांच्या सुख-दुखा:त साथ देण्याची शपथ घेतात. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे. एका 23 वर्षीय अनुराधा नावाच्या तरुण महिलेने लग्न या संकल्पनेला आपल्या पद्धतीने वापरून घेतले आहे. तिने 23 व्या वर्षापर्यंत तब्बल 25 लग्न केले आहेत. म्हणजेच ही महिला 23 व्या वर्षापर्यंत तब्बल 25 पतींसोबत राहिली आहे. विशेष म्हणजे एकदा लग्न करून ती असा कांड करायची की सगळेच अचंबित होऊन जायचे.
23 व्या वर्षी अनुराधाचे 25 लग्न
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनुराधा नावाची ही महिला मध्य प्रदेशातील भोपाळमधील शिवनगर येथील रहिवासी आहे. तिचे वय 23 वर्षे आहे. ती उपवर मुलीच्या शोधात असलेल्या तरुणांना गाठायची आणि त्यांच्यासोबत लग्न करायची. विशेष म्हणजे लग्नानंतर ती घर लुटून दोन-तीन दिवसांत फरार व्हायची. अशाच पद्धतीने तिने तब्बल 25 पुरुषांना फसवलेले आहे. एखाद्या पुरुषाशी लग्न केल्यानंतर ती एक ते दोन दिवस तिच्या सासरी राहायची. नंतर अंदाज घेऊन घरातील सोने, दागिने, पैसे घेऊन पोबारा करायची.
…अन् अनुराधाचा खरा चेहरा समोर आला
अनुराधाच्या विष्णू गुप्ता नावाच्या एका पतीने पोलिसात तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सुनिता आणि पप्पू मीना नावाच्या दोन व्यक्तींनी मला खूप चांगली नवरी शोधून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र ज्या मुलीसोबत माझे लग्न लावून दिले ती घरातील पैसे, दागिने घेऊन पळून गेली, असे विष्णू गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर अनुराधाचा खरा चेहरा समोर आला. विष्णू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर सातव्या दिवशी अनुराधा घरातून पळून गेली होती. सोबत तिने घरातील दोन लाख रुपये नेले. हे लग्न सवाई माधोपूर येथे झाले होते. सोबत तिने दागिने, मोबाइलही नेला.
अनुराधा तरुणांना कशी लुबाडायची?
दरम्यान पोलिसांनी तपास केल्यानंतर अनुराधा नावाच्या या लुटमार करणाऱ्या नवरीची खरी माहिती समोर आली आहे. लग्नासाठी मुलीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना अनुराधाची टोळी गाठायची. त्या तरुणाला अगोदर अनुराधाचा फोटो दाखवला जायचा. त्यानंत लग्नासाठी ते पाच ते सहा लाख रुपये वसूल करायचे. त्यानंतर थाटात लग्न लावले जायचे. मात्र लग्न लावल्यानंतर पुढच्याच काही दिवसांत अनुराधा आपल्या सासरमधून पळून जायची. आता पोलिसांनी अनुराधाला अटक केले असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
