आधी गोळीबार केला नंतर थेट बसमधून… शातिर आरोपींना असं पकडलं; काय घडलं पुण्यात?
देहूरोड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत दोघांना अटक केली आहे. आरोपींनी वेगवेगळे मार्ग वापरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांच्या तांत्रिक मदतीने त्यांचा शोध लावला गेला. पोलिसांच्या तपासानंतर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.

पुण्यातील देहूरोड येथे झालेल्या गोळीबारातील आरोपींना अवघ्या 48 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी अटक करू नये म्हणून या आरोपींनी वेगवेगळे फंडे वापरले होते. पण त्यांचे सर्व फंडे पोलिसांनी मोडीत काढले. पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने या सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींची चौकशी केल्यावर आधी त्यांनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. पण पोलिसी खाक्या बसताच हे आरोपी पोपटा सारखे पोलू लागले. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
देहूरोड परिसरात गोळीबार करणाऱ्या साबीर शेखसह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारच्या रात्री बर्थडे सेलिब्रेशन सुरु असताना हा गोळीबार झाला होता. यात विक्रम रेड्डीचा मृत्यू झाला होता. तर नंदकिशोर यादव आणि अशोक मनहार जखमी झाले होते. पूर्ववैमनस्य आणि बर्थडे सेलिब्रेशनवेळी झालेला वाद यातून ही घटना घडल्याचं समोर आलंय.
चार गोळया झाडल्या
आरोपींनी एकूण चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी विक्रम रेड्डीला लागली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला होता. गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत दोन जणांना अटक केली. शाबीर शेख, साई तेजा चितमल्ला उर्फ जॉन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या शोधात तीन पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर या आरोपींना सोलापूरमधून शिताफीने पोलिसांनी अटक केली.
धुळ्यातून पिस्तुल घेतलं
विशेष म्हणजे हे आरोपी फरार झाल्यानंतर थेट सोलापूरमध्ये गेले आणि त्यांनी केवळ बसमधूनच प्रवास करत फिरत राहिले. हे आरोपी कोणत्याही एका ठिकाणी थांबले नाहीत. तरी देखील पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच आरोपींनी गोळीबारात वापरलेलं पिस्तूल धुळे येथील शिरपूर येथून घेतल्याचं आरोपींनी कबूल केलंय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.