भारताची राजधानी दिल्ली हादरली! पोलीस असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
भारताची राजधानी दिल्ली हादरली आहे. दिल्लीत पोलीस असल्याचे सांगून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भारताच्या राजधानी दिल्लीत हादरवणारी घटना घडली आहे. दिल्लीत एका पार्कमध्ये 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तीन आरोपींनी पोलीस असल्याचे सांगून चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आलं आहे. ही संतापजनक घटना दक्षिण दिल्लीच्या कालकाजी मंदिराजवळ घडली आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी सोमवारी सात वाजण्याच्या सुमारास 17 वर्षीय मुलगी मित्रासोबत कालकाजी मंदिरात गेली होती. मंदिरात पूजा केल्यानंतर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारात एका पार्कमध्ये गेले. पार्कात तरुणीजवळ 25 ते 30 वयोगटातील तीन आरोपी पोहोचले. त्यांनी तिला पोलीस असल्याचे सांगितले.
आरोपींनी पीडित तरुणीसह मित्राला धमकावलं. एका आरोपीने बंदुक आणि चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, रात्री 8.45 वाजता कालकाजी मंदिर आणि इस्कॉन मंदिराच्या जवळील पार्कमधून एकाने फोन करून अत्याचार झाल्याची माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीला नेलं. तरुणीच्या जबाबावरून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथके तयार केली आहेत. एका संशयास्पद वागणूक दिसल्याने त्याला पोलिसांनी अडवलं. परंतु त्याने निसटून पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी त्याला शरण जाण्यास सांगितले. पण त्याने थांबण्यास नकार दिला. त्याने उलट पोलिसांवरच तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर एका अधिकाऱ्याने आरोपीच्या पायावर गोळी झाडून अटक केली. पोलिसांनी या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर दिल्लीत संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
