सांगलीत तहसील कार्यालयात रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच, परिसरात एकच खळबळ

शंकर देवकुळे

| Edited By: |

Updated on: Sep 19, 2021 | 12:12 AM

सांगलीच्या कडेगाव येथील तहसील कार्यालयावर देशी-विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच शनिवारी (18 सप्टेंबर) आढळून आला. या धक्कादायक प्रकाराने महसूल विभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीत तहसील कार्यालयात रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच, परिसरात एकच खळबळ
संग्रहित छायाचित्र.

सांगली : सांगलीच्या कडेगाव येथील तहसील कार्यालयावर देशी-विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच शनिवारी (18 सप्टेंबर) आढळून आला. या धक्कादायक प्रकाराने महसूल विभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयावर कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शोले स्टाईल आंदोलन सुरु होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्या साक्षीने हा प्रकार उघडकीस आला.

नेमकं काय घडलं?

कडेगाव तहसील कार्यालय म्हणजे तालुक्याचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे. येथून तालुक्याचे सर्व प्रशासकीय कामकाज चालते. तर सध्या तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करीमुळे येथील तहसील कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातच आता कार्यालयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्या साक्षीने देशी-विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. या प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाल्याने आंदोलनस्थळी असलेले प्रभारी नायब तहसीलदार जे. एन. लाड यांनी येथील दारुच्या बाटल्या हटवण्याचा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

तहसीलदारांची भूमिका नेमकी काय?

दरम्यान, तहसील कार्यालयावर देशी-विदेशी दारुच्या बाटल्या कुठून आल्या? याबाबत उपस्थितासह तालुक्यातील नागरिकांतून तर्क- वितर्काना चांगलेच उधाण आले आहे. “तहसील कार्यालयावर दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्या तेथून लगेच हटवण्यात आल्या आहेत. परंतु त्या येथे कशा आल्या, कोणी ठेवल्या याबाबत चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया नायब तहसीलदार जे.एन.लाड यांनी दिली.

मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

गेल्या महिन्यात अशीच एक घटना मंत्रालयात घडली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मंत्रालयातील त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा? असा प्रश्न निर्माण झाला होता.

मंत्रालयापाठोपाठ आता औरंगाबाद महापालिकेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर औरंगाबादच्या महानगरपालिकेतही दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या. औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात देशी, विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या आवारात कुणाची ओली पार्टी रंगते? या ओल्या पार्टीत कोण कोण सहभागी असतं?, अशा चर्चा आता औरंगाबाद शहरात सुरु झाल्या होत्या.

हेही वाचा :

विवस्त्र होऊन दगडफेक, गाड्या अडवल्या, रुग्णवाहिकेचा ताबा घेतला, पुण्यात माथेफिरुचा धिंगाणा

‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं

रस्त्याने चालत असताना अचानक वायर तुटली, मोठी दुर्घटना, दोन भावांचा होरपळून जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI