Ajit Pawar on Vaishnavi Hagavane death : त्यांचं लव्ह मॅरेज होतं, वैष्णवीने जरा जरी सांगितलं असतं…अजित पवार यांची प्रतिक्रिया काय?; नववधूंना काय केलं आवाहन?
वैष्णवी हगवणे यांच्या दुर्दैवी मृत्युप्रकरणी फरार असलेले सासरे आणि दीर यांना पहाटे अटक झाली. अजित पवार यांनी या प्रकरणी आपला काहीही संबंध नाही हे स्पष्ट केले आहे. त्यांनी नववधूंना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे आणि दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून, वैष्णवीच्या वडिलांची अजित पवार आज भेट घेतील.

पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण असून तिचा अतोनात छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येत आहेत. आज पहाटे वैष्णवीचे फरार सासरे आणि दीरा यांना अटक करण्यात आली आहे. तिची नणंद, पती आणि सासू आधीच पोलसांच्या ताब्यात आहेत, मात्र दीर व सासरे सात दिवसांपासून फरार होते. अखेर त्यांना आज पहाटे स्वारगेट येथून बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली असून त्या प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अजित दादांनी नववधूंना एक आवाहनही केलं आहे. ‘सर्व मुलींना आवाहन आहे, त्यांना जराही काही डाऊट आला तर त्यांनी तक्रार करा. त्यावर कारवाई करता येऊ शकते. इतकी मोठी वेळ कुणावर येणार नाही’ असं अजित दादा म्हणाले. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री आणि मी सक्त सूचना दिल्या आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं.
काय म्हणाले अजित पवार ?
दुर्देवाने वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर काही नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला बदनाम करत आहेत. माझा त्यात दुरान्वयेही संबंध नाही. मी काल जाहीरपणे सांगितलं, पहिल्या दिवसापासून चौबे सीपी आहेत, त्यांना आदेश दिले. याच्याकडे केस आहे, त्याच्याकडे केस आहे, असं करू नका. कारवाई करा. याप्रकरणात दोघांना अटक झाली नव्हती. पणतीन टीम तयार केल्या होत्या. मी काल पुन्हा चौबेंना सांगितलं अजून टीम वाढवा पण यांना अजिबात सोडता कामा नये. ताबडतोब अटक करा. नवे कायदे, जुने कायद्याचे कलमे लावून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले, असे अजित पवार यांनी सांगितलं.




आज संध्याकाळी घेणार वैष्णवीच्या वडिलांची भेट
मी मुलीच्या वडिलांशी बोललो. मी कोल्हापूरचे कार्यक्रम करून पुण्याला जाईल. संध्याकाळी मुलीच्या वडिलांना भेटायला जाणार आहे, असंही अजित पवार म्हणाले. त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्या मुलीने मला जरा जरी सांगितलं असतं, दादा मला इथे असा असा त्रास होतो तर मी पुढच्या अॅक्शन घेतल्या असत्या, असं ते म्हणाले.
पण त्यांच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी आता सासंरच्यांर कारवाई व्हावी अशी इच्छा प्रदर्शित केली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री आणि मीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. दोषींवर आम्ही कडक कारवाई करू. कारवाईत कसूर करणार नाही. पोलीस आणि आम्ही काळजी घेत आहोत. मी कस्पटे परिवारा सोबत आहे, असे आश्वासन अजित पवार यांनी दिलं.
पाताळात जरी आरोपी असेल तरी..
दोन तीन दिवस आई नसल्याने मुलगा रडत होता. काल तो आजीच्या कुशीत झोपला. मी काल फोनवर बोललो. त्यांना सर्व सांगितलं. त्यांना लग्नातील गोष्टी आठवल्या. आज रात्री गेल्यावर मी त्यांच्याशी पुन्हा बोलणार आहे. आरोपी सापडत नव्हते. पण पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पाताळात जरी आरोपी असेल तरी त्याला शोधू शकतो, असं अजित पवारांनी सांगितलं.
मला उगाच बदनाम करता
अजित पवारचा या प्रकरणआशी काही संबंध नाही, दुरान्वयेही संबंध नाही. तो (हगवणे) पक्षाचा कार्यकर्ता आहे. अशा प्रकाराबाबत माझे मत आणि विचार किती स्पष्ट आहे हे तुम्हाला माहीत आहे. पण काही अँकर मला उगाच बदनाम करत आहेत. लग्नाला गेलो म्हणून तुम्ही माझा फोटो दाखवता. उद्या तुमच्या घरी आलो आणि तुम्ही फोटो काढला. उद्या तुमच्या घरात काही घडलं तर माझा काय दोष? दोष माझा नसताना मला का दोषी धरता. कस्पटेच्या वडिलांना विचार ना. काल ते फक्त माझ्याशीच बोलले. तुम्हाला अजित पवारांशिवाय उद्योग नाही, असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. कस्पटेंच्या मुलीबाबत दुखद घटना घडली. त्यात माझा काय दोष आहे. मी ते कृत्य करायला सांगितलं का? असा सवालही त्यांनी विचारला.