IPS Puran Kumar Case : लॅपटॉप, पोस्टमार्टम आणि… IPS वाय पूरन जीवन संपवण्याआधी शेवटचं कोणाशी बोललेले?
IPS Puran Kumar Case : आयपीएस वाय पूरन कुमार सुसाइडला 7 दिवस उलटून गेल्यानंतरही अजून पोस्टमार्टम झालेलं नाही. पोलिसांना अजूनपर्यंत तो लॅपटॉप मिळालेला नाही, ज्यात 9 पानी सुसाइड नोट टाइप केलेली आहे.

हरियाणाचे IPS अधिकारी वाय पूरन कुमार सुसाइड प्रकरणाचा विषय तापत चालला आहे. आत्महत्येच्या सात दिवसानंतरही मृतदेहाच पोस्टमार्टम झालेलं नाही. पोलीस सूत्रांनुसार, वाय पूरन कुमार यांचा तो लॅपटॉप अजूनपर्यंत तपास पथकाला मिळालेला नाही, ज्यात कथितरित्या 9 पानांची सुसाइड नोट टाइप केलेली. एसआयटीसाठी लॅपटॉपची फॉरेंसिक तपासणी, त्यावरील फिंगरप्रिंटस आणि मृतकाच्या ई-मेल अकाऊंटची तपासणी महत्वपूर्ण आहे.
पोलिसांच म्हणणं आहे की, जो पर्यंत वाय पूरन कुमार यांच्या मृतदेहाच पोस्टमार्टम होणार नाही, तो पर्यंत कायदेशीररित्या तपास पुढे जाऊ शकत नाही. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मृत व्यक्तीचे कुटुंबीय पोस्टमार्टमला नकार देत असतील, तर पोलीस मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत स्वत: पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण करु शकतात. जेणेकरुन पुरावे नष्ट होऊ नयेत. सध्या कुटुंबाने पोस्टमार्टमसाठी औपचारिक मंजुरी दिलेली नाही. कुटुंबीय तयार होताच पीजीआय चंदीगडचे डॉक्टर्स, एक मॅजिस्ट्रेट आणि बॅलेस्टिक एक्सपर्टच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
बॅलेस्टिक तपास का आवश्यक?
बॅलेस्टिक तपास यासाठी आवश्यक आहे कारण सर्विस रिवॉल्वरमधून जी गोळी निघाली, त्या शस्त्राचा वास्तवात वापर झाला होता की नाही?. आत्महत्येला सात पेक्षा जास्त दिवस झालेत, त्यामुळे मृतदेह खराब होण्यास सुरुवात झाली आहे. यात गन पावडरचे अवशेष आणि अन्य भौतिक पुरावे गोळा करणं कठीण होऊ शकतं.
CDR मध्ये महत्वाचे पुरावे
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना आतापर्यंत कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये (CDR) काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. सुसाइडच पाऊल उचलण्याआधी पूरन कुमार यांनी काही अधिकारी, वकील आणि काही ओळखीच्या लोकांसोबत चर्चा केलेली. SIT या लोकांची चौकशी करणार आहे. कोणाचा मानसिक दबाव किंवा तणावाखाली त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचललं, हे शोधून काढण्यासाठी SIT चौकशी करेल.
गोळी झाडली तेव्हा घरात कोण होतं?
वाय पूरन कुमार 2001 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांची पत्नी अमनीत पी. कुमार हरियाणा केडरची आयएएस अधिकारी आहे. सध्या त्या परराष्ट्र सहकार्य विभागात आयुक्त आणि सचिव आहेत. ही घटना 7 ऑक्टोंबर रोजी मंगळवारी झाली. वाय पूरन कुमार यांनी चंदीगड येथील आपल्या निवासस्थानी बेसमेंटमध्ये सर्विस रिवॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडली. त्यावेळी घरात त्यांची पत्नी नव्हती. केवळ मुलगी होती.
