
मध्य प्रदेशमधील इंदौर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या मेघालयातील हत्येचा आणि त्यांच्या पत्नी सोनमच्या 14 दिवसांपासून बेपत्ता असण्याच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राजा यांचा मृतदेह मेघालयातील सोहरा (चेरापूंजी) येथील एका खोल दरीत सापडला, परंतु सोनमचा कोणताही सुगावा लागलेला नाही. कुटुंबीयांचा दावा आहे की, राजा त्यांचा भाऊ विपिन याच्या स्वप्नात आला आणि आपल्या हत्येची माहिती देऊन सीबीआय चौकशीची मागणी करत होता.
कुटुंबाची मागणी आणि पोलिसांचा तपास
इंदौरमधील पीडित कुटुंबाने घराबाहेर एक बॅनर लावला आहे, ज्यावर लिहिले आहे, “राजाची आत्मा सांगत आहे- मी मेलो नाही, मला मारले गेले आहे. सीबीआय चौकशी व्हावी.” विपिनने सांगितले, “राजा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की त्याचा खून झाला आहे. आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे.” दरम्यान, शिलाँग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. परंतु बेपत्ता सोनम आणि या खुनाच्या रहस्यामागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.
नेमकं काय घडलं?
इंदौरच्या सहकार नगर येथील रहिवासी राजा रघुवंशी (वय 29) आणि सोनम यांचा विवाह 11 मे 2025 रोजी थाटामाटात झाला होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झालेल्या या विवाहानंतर, 20 मे रोजी हे नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी इंदौरहून गुवाहाटीला रवाना झाले. इंदौरहून बेंगलोरमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले, जिथे त्यांनी कामाख्या मंदिरात दर्शन घेतले. 22 मे रोजी ते गुवाहाटीहून शिलाँगला पोहोचले. परंतु शिलाँगला पोहोचल्यानंतर 48 तासांच्या आत, 23 मे रोजी दोघेही रहस्यमयरित्या बेपत्ता झाले.
शेवटचे बोलणे काय झाले
23 मे रोजी दुपारी 1:43 वाजता सोनमने तिच्या सासू उमा रघुवंशी यांच्याशी शेवटचे फोनवर बोलणे केले. या रेकॉर्ड केलेल्या कॉलमध्ये सोनमने सांगितले की, ते जंगलात ट्रेकिंग करत आहेत, जिथे एक धबधबा आहे. ती म्हणाली, “आम्ही खूप उंच डोंगरावर चढून आलो आहोत, मी खूप थकले आहे. मी राजाला नको म्हटलं होतं, पण तो ऐकला नाही. फक्त कॉफी प्यायले आहे.” दुपारी 2 वाजल्यानंतर सोनम आणि राजा दोघांचेही फोन बंद झाले. कुटुंबाला वाटले की नेटवर्कचा अडथळा असेल, परंतु 24 आणि 25 मे पर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने चिंता वाढली.
एका दुसऱ्या ऑडिओमध्ये राजा आपल्या आईशी बोलताना म्हणतो, “आम्ही वर पोहोचलो आहोत, फळं खात आहोत. इथे इंटरनेट नाही.” हे त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. 26 मे रोजी राजा आणि सोनमचे भाऊ विपिन व गोविंद शिलाँगला पोहोचले. ईस्ट सोहरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यावर राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला. तर सोनम गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता आहे.