राजा रघुवंशी हत्येप्रकरणी मोठा खुलासा, कुंडलीतच होता मृत्यूचा योग, पंडित अजय दुबे यांचा दावा काय?
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. राजाची पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह हे हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पंडित अजय दुबे यांनी राजा आणि सोनमच्या कुंडलीत मंगळदोष असल्याचा दावा केला आहे.

इंदूरमधील राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. राजाच्या हत्याकांडाची मुख्य सूत्रधार त्याची पत्नी सोनम रघुवंशी हीच होती, अशी माहिती समोर येत आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या प्रकरणी पोलिसांनी सोनम रघुवंशी, राज कुशवाह आणि हत्येचा कट प्रत्यक्षात आणणाऱ्या अन्य तिघांना अटक केली आहे. आता याप्रकरणी पंडित अजय दुबे यांनी एक मोठा दावा केला आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या कुंडल्या पाहणारे पंडित अजय दुबे यांनी या संदर्भात एक मोठा दावा केला आहे. पंडित दुबे यांच्या मते, राजा आणि सोनम या दोघांच्याही कुंडल्यांमध्ये मंगळ दोष होता. लग्नासाठी त्यांची कुंडली जुळत नव्हती.
पंडित अजय दुबे काय म्हणाले?
पंडित अजय दुबे यांनी सांगितले की राजाचा मृतदेह आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची कुंडली दाखवली होती. त्यावेळी पंडित अजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांच्याही कुंडलीमध्ये मंगळ दोष होता. हा अशुभ योग समजला जातो. सोनम राजाची हत्या घडवून आणू शकते, असा योग कुंडलीत दिसत होता, असे दुबे यांनी सांगितले. अजय दुबे यांनी असाही दावा केला की, या खून प्रकरणात दोन मुली सहभागी आहेत. या गुंतागुंतीच्या हत्याकांडाच्या चौकशीत आणखी एका मुलीचे नाव समोर येईल. ही मुलगी मध्य प्रदेशातील आहे. या घटनेत आरोपींची संख्या आणखी वाढू शकते.
राजाचा भाऊ सचिन रघुवंशी यांनी सांगितले की, माझ्या भावाने सोनमला सांगितले होते की कामाख्या देवीच्या दर्शनानंतरच आपण एकमेकांच्या जवळ येऊ, कारण हा एक नवस होता. पण तिने जे काही केले, ते एखाद्या धूर्त मारेकऱ्यापेक्षा कमी नव्हते. सचिन रघुवंशी यांनी पुढे सांगितले की, “त्या दोघांच्या कुंडलीत मंगळ दोष होता. अशा प्रकरणांमध्ये मुलाचा मृत्यू होतो. पण ही पूर्वनियोजित हत्या होती. याप्रकरणी दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन न देता त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी.”
बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा प्रियकर राज आणि सोनम हे हवाला नेटवर्कशी देखील जोडले गेले होते. हत्येच्या कटासाठी वापरले गेलेले पैसे हवालामार्गे आले होते. राजने पीथमपूरमधील एका हवाला व्यावसायिकाकडून ५०,००० रुपये घेतले होते, जे त्याने हत्येपूर्वी आपल्या तीन मित्रांमध्ये वाटले. याच तीन मित्रांनी राजाची हत्या केली. आता तपासात जितेंद्र रघुवंशी नावाचे एक नवीन नाव समोर आले आहे. ज्याच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले आहेत.
इंदूरच्या राजा रघुवंशी आणि सोनमचे लग्न याच वर्षी ११ मे रोजी झाले होते. लग्नानंतर ते दोघे आसाममधील कामाख्या देवी मंदिरात गेले. तेथून ते दोघे हनिमूनसाठी मेघालयातील शिलॉंग येथे गेले. याच ठिकाणी राजाची हत्या झाली. या हत्येचा आरोप राजाची पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज आणि अन्य तिघांवर आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.
