
एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. मामीच्या बहिणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या भाच्याने थेट मामाचीच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कृत्य करण्यासाठी त्याला त्याच्या चुलत भावाने आणि मित्राने मदत केल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे कौशांबी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील संदीपन घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकंदरपूर बजहा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी एका झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्ती 28 वर्षाचा असून महेंद्र प्रजापती ऊर्फ छोटू असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
वाचा: सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…
तीन तरुणांवर संशय बळावला
मृतदेहाशेजारी एक पिकअप वाहन होतं. त्यावरील नंबरवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर सर्व्हिलान्सच्या मदतीने पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल काढली. त्यात तिघांवर संशय बळावला. पोलिसांनी महेंद्रच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी आकाश, रोहित आणि छोटू ऊर्फ विजय भारतीय या तीन तरुणांवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून तिघांनाही मनौरी पुलिया या ठिकाणी जेरबंद केलं.
ती प्रचंड आवडायची, दोनदा पळालो
त्यानंतर पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली. यावेळी आरोपी आकाशने केलेल्या खुलाश्याने सर्वच हादरून गेले. मृतक छोटू ऊर्फ महेंद्र त्याचा मामा असल्याचं त्याने सांगितलं. मी मामीच्या बहिणीवर प्रचंड करत होतो. यापूर्वी दोनदा मामीच्या बहिणीला घेऊन पळून गेलो होतो. त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी पंचायत बोलवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मामाने मला प्रचंड झापलं होतं. तसेच सर्वांसमोर माझा अपमान केला होता. त्यामुळेच मामाच्या विरोधात माझ्या मनात सूडाची भावना होती, असं आकाशने पोलिसांना सांगितलं.
तडफडतच जीव सोडला
गुरुवारी रात्री आकाशने चुलत भाऊ रोहित आणि मित्र विजय यांना सोबत घेऊन मामाच्या हत्येचा प्लान आखला. या तिघांनी महेंद्रला सुनसान जागी बोलावलं. महेंद्र येताच या तिघांनी त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले. त्यामुळे डोक्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि महेंद्र खाली कोसळला. जमिनीवर तडफडतच त्याने जीव सोडला. त्यानंतर या तिघांनी रस्त्याच्या बाजूला मृतदेह फेकला. अपघात झाल्याचं भासावं म्हणून त्यांनी रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, रक्ताने माखलेले कपडे, तसेच घटनेच्यावेळची बाईक जप्त केली आहे. पोलीस अधिक्षकाच्या नेतृत्वात या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
आणि ओळख पटली
आम्हाला घटनास्थळी पिकअप नंबर मिळाला होता. त्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर आम्ही महेंद्रच्या कुटुंबीयांची चौकशी केली. मृतकाच्या मोबाईल सर्व्हिलान्सकडून चेक केला. त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली, असं सीओ सतेंद्र तिवारी यांनी सांगितलं.