VIDEO | हळदीला तलवारींसह डान्स, ‘लग्नाच्या बेड्या’ पडता-पडता नवरदेवाला पोलिसांच्या बेड्या

| Updated on: Feb 23, 2022 | 11:12 AM

लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात काही युवक हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालत होते. मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन त्यांचा डान्स सुरु होता.

VIDEO | हळदीला तलवारींसह डान्स, लग्नाच्या बेड्या पडता-पडता नवरदेवाला पोलिसांच्या बेड्या
लातुरात नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स
Follow us on

लातूर : बोहल्यावरुन चढून लग्नाच्या बेड्या घालण्याच्या तयारीत असलेल्या लातूरमधील नवरदेवाला (Groom) अखेर पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे (Dance with Sword) नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील पाच जणांना आधीच अटक करण्यात आली होती. तर ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरदेव फरार झाला होता. लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांनी (Latur Crime) त्याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात काही युवक हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालत होते. मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन त्यांचा डान्स सुरु होता. 16 फेब्रुवारीच्या रात्री हा हळदीचा कार्यक्रम झाला होता.

हळदीच्या धिंगाण्यात पोलिसांची एन्ट्री

हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचं पाहताच नाचणाऱ्यांची धावपळ सुरु झाली.

सात जणांवर गुन्हा, नवरदेव फरार

तलवारी ताब्यात घेऊन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातल्या पाच जणांना विवेकानंद चौक पोलिसांनी अटकही केली. मात्र नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला होता. ऐन लग्नाच्या दिवशीच पसार होण्याची वेळ नवरदेवावर त्याच्या मित्रांमुळे आली आहे.

विवेकांनद चौक पोलिसांनी कारवाई करत अखेर नवरदेवाला बेड्या ठोकल्या, त्याच्या तीन मित्रांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती आहे.

तलवार डान्सचा ट्रेण्ड

हातात तलवारी घेऊन हळदीत नाचणे किंवा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याची फॅशन लातूरमध्ये पहायला मिळत होती. आता पोलिसांच्या या कारवाईने तलवारी नाचवण्याच्या प्रकारावर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा आहे.