व्हिडीओ डिलीट करायच्या बहाण्याने बोलावून गँगरेप, परभणीतील पीडितेच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा संताप

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

व्हिडीओ डिलीट करायच्या बहाण्याने बोलावून गँगरेप, परभणीतील पीडितेच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा संताप
परभणीतील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर पीडितेने विषप्राशन केलं होतं. सहा दिवसाच्या झुंजीनंतर तिचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन आरोपींच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दोन अल्पवयीन आरोपींसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

दोन अल्पवयीन आरोपींसह तिघे अटकेत

या प्रकरणात गुन्हा दाखल होताच सोनपेठ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली होती. यातील तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी सकाळी परळी परिसरातून अटक केला आहे, अशी माहिती सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांनी दिली. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

आरोपींना फाशी द्या, आईची मागणी

बलात्कार पीडित मुलीच्या घरी शोकाकुल अवस्था आहे. दिघोळ रेवा तांडा गावातील ग्रामस्थ मुलीच्या घरी जमले आहेत. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी तिच्या आईने केली आहे. घाबरुन शेवटपर्यंत मुलीने आम्हाला सांगितलं नाही, पण दवाखान्यात भावाला सगळं सांगितलं, असंही आईने सांगितलं. मोबाईलमध्ये झालेली रेकॉर्डिंग तू तुझ्या हाताने डिलीट कर म्हणून मुलीला घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली.

नेमकं काय घडलं?

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपीने मोबाईलमध्ये तिचा व्हिडीओ शूट केला आणि बदनाम करुन त्रास देण्याची धमकीही दिली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने विषारी औषध घेतले होते. लातूरच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गावातील मुलगा आदर्श शिंदे हा पीडितेची वारंवार छेड काढायचा. पीडितेने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबियांनी आदर्शला समजावून सांगितलं. त्यानंतर सर्व प्रकरण मिटलं असेल, असं पीडितेच्या कुटुंबियांना वाटलं. पण प्रकरण मिटण्याऐवजी आणखी चिघळलं होतं.

14 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पीडितेने विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यामुळे पीडितेला उलट्या होऊ लागल्या. पीडितेच्या आईने तिला त्यामागील कारण विचारलं असता तिने विष प्राशन केल्याचं सांगितलं. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू

पीडितेच्या आईने तातडीने घरातील इतर सदस्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पीडितेला तातडीने आंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारानंतर पीडितेला पुढील उपचारासाठी लातूरला नेण्यात आलं. पीडितेने जवळपास सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. पण तिची ही झुंज अखेर अपयशी ठरली. लातूरच्या रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

भावाला सांगितलेलं आत्महत्येचं कारण

पीडितेने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला? याबाबतची माहिती तिने स्वत: 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आपल्या भावाला सांगितली होती. पीडितेने भावाला दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या दरम्यान आदर्श शिंदे याने फोन करुन तरुणीला गावाजवळील एका पडक्या शाळेत बोलावले. यावेळी तिथे त्याच्यासोबत मयुर मुंजा मुठाळ, सुशिल भागवत शिंदे हे दोघंही होते. त्या तिघांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या पीडितेने 14 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

गँगरेपचे व्हिडीओ शूट, अल्पवयीन मुलीची आत्महत्या, लातुरातील रुग्णालयात कुटुंबीयांचा टाहो

लग्नाहून परतताना तरुणीवर सामूहिक बलात्कार, लिफ्टच्या बहाण्याने तिघांकडून अत्याचार

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI