Kalyan Crime : आधी मराठी-अमराठी वाद, नंतर रिक्षावाल्यांची दादागिरी, आता बेछूट गोळीबारात 1 ठार; कल्याणमध्ये चाललंय काय ?
आता कल्याणमध्ये थेट रस्त्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व येथील काटेमानिवलीच्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाला. यामध्ये रणजीत दुबे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्यांच्या घटनांमुळे कल्याण नुसतं गाजतंय. काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानतंर कल्याणच्या एका सोसायटीमध्ये मराठी-अमराठी कुटुंबाचा वाद होऊन हाणामारीही झाली . हे प्रकरण ताजं असतानाचं गेल्या महिन्यात कल्याण रेल्वे स्टेशनवर रिक्षावाल्यांनी दादागिरी करत प्रवाशाशी गैरवर्तन केलं. हे सगळं कमी की काय म्हणू आता कल्याणमध्ये थेट रस्त्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कल्याण पूर्व येथील काटेमानिवलीच्या नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाला. यामध्ये रणजीत दुबे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील जागेच्या वादावरून चुलत भावाकडूनच रणजीत दुबेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला आणि आरोपी राम दुबे याला बेड्या ठोकून अटक केल्याचे समजते. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
जागेच्या वादावरून गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रणजीत हा एका मोठ्या गँगसाठी काम करत होता. तो कल्याणच्या काटेमानिवली येथील पावशे चौकात रहा होता. काल मध्यरात्री तेथे बेछूट गोळीबार झाला. मृत रणजीत याची उत्तर प्रदेशमध्ये एक जागा होती. आणि त्याच जागेच्या मुद्यावरून रणजीत याचा , त्याच्या चुलत भावाशी, राम दुबेशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. तोच राग काढत काल मध्यरात्रीच्या सुमारास नाना पावेश चौकात गोळीबार करण्यात आला आणि जीव वाचवण्यासाठी रणजीत दुबे समोरच्या इमारतीत घुसला.
गोळ्या झाडल्या, डोक्यावरही शस्त्राने वार
पण राम दुबे आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग केला, ते इमारतीत घुसले आणि त्याला आणखी एक गोळी मारली. इतकंच नव्हे तर धारजदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर 7 ते 8 वारही केले. यामध्ये अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला रणजीत हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रणजीतचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी राम दुबे आणि त्याच्या साथीदारांनी बेड्या ठोकून ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत. मात्र गोळीबार आणि निर्घृण हत्येच्या या घटनेमुळे कोळसेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत.
