सोशल मीडियावरील त्या व्हिडीओनंतर रवीना टंडन संतापली, मानहानीचा दावा ठोकला
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने दावा केला होता की रवीना टंडनच्या कारने त्याच्या आईला धडक दिली होती आणि अभिनेत्रीने आईवर हल्ला केला होता, असा आरोपही त्या व्यक्तीने केला होता.

आपल्या अभिनयाने एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन सध्या एका वेगळ्या प्रकरणात अडकली आणि अचानक चर्चेत आली आहे. रवीन टंडन हिने एका व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली आहे. कथित रोड रेज घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याबद्दल आणि पोस्ट केलेला तो व्हिडीओ न काढल्यामुळे त्या व्यक्तीला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने दावा केला होता की रवीना टंडनच्या कारने त्याच्या आईला धडक दिली होती आणि अभिनेत्रीने आईवर हल्ला केला होता, असा आरोपही त्या व्यक्तीने केला होता.
पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने असाही दावा केला की ही घटना घडली तेव्हा त्या व्यक्तीची आई, बहीण आणि भाची या तिघीही अभिनेत्रीच्या घराजवळ होत्या. मात्र पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करून सखोल तपास केला. तेव्हा अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने कोणालाच टक्कर दिली नाही, हे त्यातून स्पष्ट झाले.
याप्रकरणानंतर रवीनाने आता तिच्या वकिलामार्फस संबंधित व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली आहे. अभिनेत्रीने त्या व्यक्तीला पोलिस तपासात समोर आलेल्या खऱ्या आणि योग्य गोष्टींबद्दल माहिती दिली आहे, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या नोटीशीनुसार, तो व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून हटवण्यासाठी आपल्याला विनंती करणारे पत्र पाठवावे, असे त्या व्यक्तीने रवीनाला सांगितले होते. त्यानुसार, 5 जून रोजी ईमेलद्वारे ते पत्र पाठवण्यात आले होते.
मात्र आता त्या व्यक्तीने तिच्या अकाऊंटवरून ती पोस्ट हटवण्यास नकार दिला आहे. आणि ते विनंती पत्र पुढील 24 तासांच्या आत मागे घेतले नाही तर कायदेशीर कारवाई करू, अशी धमकी आमच्या क्लाएंटला देण्यात आली आहे, असे रवीनाच्या वकीलाने नमूद केले. त्या व्यक्तीने व्हिडिओद्वारे सोशल मीडिया आणि न्यूज पोर्टलवर रवीना टंडन हिची बदनामी केली आहे, ही निश्चितच खोटी बातमी असून अतिशय अपमानास्पद आहे असेही वकिलांचे म्हणणे आहे. मानसिक छळ करून आणि यातना देऊन आपल्याला सार्वजनिकरित्या बदनामी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले, असा आरोप रवीनातर्फे नोटीशीत करण्यात आला आहे. ‘आम्ही सध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर पावले उचलत आहोत आणि न्याय मिळेल याची खात्री आहे. ही निंदनीय मोहीम सुरू ठेवल्याबद्दल त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे रवीनाच्या वकीलांनी नमूद केले.
काय आहे प्रकरण ?
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्या रवीना टंडनचा ऐएक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात रवीना टंडन हिला काही लोकांनी घेरलं होतं. मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने रवीनावर गंभीर आरोप केला. रवीना दारुच्या नशेत होती. आणि दारुच्या नशेतच तिने माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप या व्यक्तीने केला आहे. तसेच रवीनाच्या ड्रायव्हरने त्याची गाडी माझ्या आईच्या अंगावर चढवली, असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची बरीच चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी तपास केला असता अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने कोणालाच टक्कर दिली नाही, हे त्यातून समोर आले.
सीसीटीव्हीत काय दिसलं?
सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. रवीनाचा ड्रायव्हर गाडी बॅक करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. मागे मोहम्मदचं कुटुंब रस्ता पार करत होतं. तेव्हा या लोकांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि गाडी बॅक करताना मागे पाहिलं पाहिजे असं सांगितलं. यात काही बुजुर्ग महिला होत्या. त्यानंतर ड्रायव्हर आणि मोहम्मदच्या कुटुंबीयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
