घरी जाण्यासाठी खासगी टॅक्सी बूक केली, तिथेच घात झाला ! 14 वर्षांच्या मुलीला..
पीडित मुलगी ही 14 वर्षांची असून ती पवई येथे राहते. बुधवारी (14 मे) ती प्रभादेवी येथील शैक्षणिक संस्थेत गेली होती. काम झाल्यानंतर घरी जाण्यासाठी तिने दुपारीएका खासगी ॲप आधारित कंपनीच्या गाडीचं बुकिंग केलं. पण तोच निर्णय घातक ठरला.

मुंबईत आणि महाराष्ट्रात महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. एका खासगी ॲपद्वारे बूक केलेल्या टॅक्सीमध्ये अलपवयीन मुलीशी गैरवर्तन करत टॅक्सीचालकाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली असून यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी चालकाविरोधात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा भयानक घटनांमुळे खासगी टॅक्सीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महिला मुली राज्यात सुखाचा श्वास कधी घेऊ शकणार, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 14 वर्षांची असून ती पवई येथे राहते. बुधवारी (14 मे) ती प्रभादेवी येथील शैक्षणिक संस्थेत गेली होती. तेथील काम झाल्यानंतर घरी जाण्यासाठी तिने दुपारी. 4.30 च्या सुमारास एका खासगी ॲप आधारित कंपनीच्या गाडीचं बुकिंग केलं. गाडी आल्यावर ती एमएचडब्ल्यू 1824 या क्रमांकाच्या वाहनात बसली होती. मुलीने घरी जाण्यासाठी पवईचा पत्ता टाकला होता. मात्र टॅक्सीचालकाने त्या नमूद केलेल्या पत्त्यावर गाडी नेली नाही उलट त्याची कार पूर्व द्रुतगती महामार्गावरील एका निर्जन ठिकाणी नेऊन थांबवली. आजूबाजूला, रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून टॅक्सीचालकाने त्यामुलीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.
झालेल्या प्रकारामुळे हादरलेली मुलगी कशीबशी घरी पोहोचली. सगळा धीर एकवटून तिने तिच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. आपल्या मुलीसोबत जे घडलं ते ऐकून तिचे वडील हादरलेच, पण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्या नराधमाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्याचे ठरवले. ते मुलीसोबत दादर पोलीस ठाण्यात गेले आणि संपूर्ण प्रकार सांगत पोलिसांत तक्रार नोंदवली.
याप्रकरणी दादर पोलिसांनी उबेर कंपनीचा चालक श्रीयांस याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 12 अंतर्गत विनयभंग, तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे. खरंतर खासगी ॲप आधारित टॅक्सी सुरक्षित मानली जाते. परंतु अश घटनांमुळे या टॅक्सीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
