मि. इंडिया मनोज पाटीलनं सुसाईडचा प्रयत्न का केला? आरोपाच्या घेऱ्यात असलेला अभिनेता साहिल खान नेमका काय म्हणतो? वाचा सविस्तर

मनोज पाटीलची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर मुंबईच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे या प्रकरणी आरोपीच्या घेऱ्यात अडकलेला साहिल खान याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

मि. इंडिया मनोज पाटीलनं सुसाईडचा प्रयत्न का केला? आरोपाच्या घेऱ्यात असलेला अभिनेता साहिल खान नेमका काय म्हणतो? वाचा सविस्तर
मिस्टर इंडिया मनोज पाटील (डावीकडे), अभिनेता साहिल खान (उजवीकडे)


मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी सुसाईड नोट लिहिली. त्या सुसाईट नोटमध्ये त्याने अभिनेता साहिल खानच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटल्याचं समोर आलंय. त्यानंतर सोशल मीडियासह सर्वच स्तरावरुन साहिल खान याच्यावर टीकेची झोड उठली आहे. मनोज पाटीलची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर मुंबईच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे या प्रकरणी आरोपीच्या घेऱ्यात अडकलेला साहिल खान याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्याच्यासोबत बॉडी बिल्डर असलेल्या राज फौजदार नावाच्या तरुणाने देखील भूमिका मांडली. राज फौजदार हा तोच तरुण आहे ज्याचा मनोज पाटील सोबतचा फोनवर बोलण्याचा व्हिडीओ साहिल खानने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला होता.

साहिल खान पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाला?

“बॉडी बिल्डर राज फौजदारच्या मदतीसाठी मी समोर आलो. राज फौजदारला एक्सपायर झालेलं स्टेरॉईड मनोज पाटीलनं दिलं. राज फौजदारचा व्हिडीओ मी सोशल मिडीयावर शेअर केला. राज फौजदारला एक्सपायरी झालेल्या स्टेरॉईड विकलं गेलं. त्यानंतर आता सहानुभूती मिळवण्यासाठी मनोजने सुसाईट नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला”, असं साहिल खान म्हणाला. “मनोज पाटील आणि राज फौजदार यांच्यामधील वाद आहे. मनोज पाटील यांने स्टेरॉईड एक्सपायर झालेले दिले होते. या संदर्भात राज फौजदार पुढचं सांगेल”, असं तो यावेळी म्हणाला.

राज फौजदार नेमकं काय म्हणाला?

“मनोज पाटीलने मला एक्सपायर झालेले स्टेरॉईड दिले. त्यांनी माझ्याकडून 2 लाख रुपये स्टेरॉईडसाठी घेतले होते. पण एक्सपायर झालेले स्टेरॉईडचं सेवन केल्याने माझी तब्येत खराब झाली. त्यामुळे मी माझे स्टेरॉईडचे 2 लाख रुपये परत मागितले. त्यावरुन मनोज यांनी मला शिवीगाळ केली. इंजेक्शन 2019 मध्ये दिले होते. त्यांच्याकडून 2 लाख पाहिजे होते. दोन वर्षांपासून पैसे मागत होतो. त्यावरुन मनोज पाटील यांनी मोबाईलवर मला धमक्या दिल्या होत्या”, असं राज फौजदार म्हणाला.

साहिल खानने शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

साहिल खानने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बॉडी बिल्डर राज फौजदार याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो मनोज पाटीलला फोन करताना दिसतो. तसेच व्हाट्सअॅपवर चॅट करताना दिसतो. त्यानंतर तो फोनवर बातचितही करतो. यावेळी तो एक्सपायर झालेल्या स्टेरॉईडचे दोन लाख रुपये मागतो. त्यावर मनोज कंपनीकडे तक्रार करुन पैसे मागवत असल्याचं बोलताना दिसत आहे. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची होते. तसेच या व्हिडीओत राज फौजदार आपल्याला सपोर्ट करा, असं आवाहन प्रेक्षकांना करताना दिसतोय.

मनोज पाटीलची आत्महत्या

मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 16 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

साहिल खानविरोधात याआधी मनोजने पोलिसांकडे तक्रार केलेलं पत्रही समोर आलं आहे. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे.

कोण आहे मनोज पाटील?

मनोज पाटीलने 2016 मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ (Mr India Men’s Physique Overall Championship) हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

मनोज पाटीलचे आरोप काय?

साहील खान नामक एक इन्फ्लुएन्सर आहे. तो काही दिवसांपासून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मला आणि माझ्या न्यूट्रिशन शॉपला टार्गेट करत आहे. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला त्याचा खूप त्रास झाला आहे. मी एका मिडल क्लास फॅमिलीला बिलाँग करतो आणि माझ्या झालेल्या प्रगतीमुळे त्याला खूप जलस फील होत असल्यामुळे तो माझ्या आणि माझ्या शॉपबद्दल सोशल मीडियावर खूप काही बोलला आहे. त्याच्याद्वारे मला खूप धमक्या सुद्धा दिल्या गेल्या आहेत, की तुझं करिअर मी संपवून टाकेन. किंबहुना तो माझ्या बिल्डिंगखाली सुद्धा येऊन गेला. मला नाही माहित त्याच्यामागे त्याचा काय उद्देश होता.

हे सगळं चालू असताना आता तर तो माझ्या वाईफला घेऊन प्लॅन करतोय, की माझ्यावर माझ्या बायकोद्वारे काहीही अशी केस करुन मला अडकवायचं आणि मला कोर्ट कचेरीमध्ये ठेवून माझा यूएसएचा विजा कायमचा बरखास्त करायचा. कारण मला आता मिस्टर ऑलिम्पिया खेळण्यासाठी यूएसएला जायचंय. माझ्या आणि माझ्या वाईफमध्ये असलेल्या अनबनीचा फायदा घेऊन तिचा माईंड डायवर्ट करुन मला फसवून माझं करिअर कायमचं संपवायचं. आता हे सगळं पाहून मी आणि माझी फॅमिली खूप त्रस्त झालो आहोत. माझ्या घरी मी एकच कमवता मुलगा आहे आणि माझी आई हाऊसवाईफ आणि बाबा 65 वर्षांचे रिटायर्ड आहेत.

मला हा सगळा छळ पाहता आता खरंच सुसाईड करायला तो भाग पाडत आहे, असाच माझा छळ चालू राहिला तर येत्या काही दिवसात मी माझ्या जीवाचे काहीही बरेवाईट करुन घेणार आणि त्यानंतर या गोष्टीची पूर्ण जिम्मेदारी सरकार, पोलीस आणि साहिल खान याची असणार, असं मनोज पाटीलने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात आढळलं आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.

हेही वाचा :

‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!

Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI