Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे

Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न
मिस्टर इंडिया मनोज पाटील (डावीकडे), अभिनेता साहिल खान (उजवीकडे)

मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

साहिल खानविरोधात याआधीही मनोजने पोलिसात तक्रार केल्याचं समोर आलं आहे. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे

कोण आहे मनोज पाटील?

मनोज पाटीलने 2016 मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ (Mr India Men’s Physique Overall Championship) हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

वर्तमानपत्र विकण्यापासून सुरुवात

मनोजचा जन्म 1992 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांने वयाच्या 13 व्या वर्षीच आपल्या कुटुंबासाठी कमाई करण्यास सुरुवात केली होती. आधी तो वर्तमानपत्र दारोदार जाऊन वितरित करायचा, दूध विकायचा आणि गाड्याही धुवायचा. तेव्हा महिन्याला अंदाजे 400 ते 500 रुपये तो कमवत होता.

या काळात त्याने दररोज व्यायाम करणाऱ्‍या आपल्या भावाकडून प्रेरणा घेतली आणि वयाच्या 16 व्या वर्षी मनोजने जवळच्या जिममध्ये वर्कआऊट करण्यास सुरुवात केली. वयाच्या 18 व्या वर्षी त्याला शरीरसौष्ठव स्पर्धांबद्दल माहिती मिळाली आणि काही स्पर्धांमध्ये त्याने भाग घेण्यास सुरुवात केली. पण पदरी आलेल्या अपयशाने तो खचून गेला नाही, तर त्याने येत्या काही वर्षांत अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली.

ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत सुवर्ण

वयाच्या 20 व्या वर्षी मनोज पाटीलने 8-10 स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि काही किताब जिंकले, परंतु तरीही तो मुख्य विजेतेपदांपासून दूरच होता. 21 व्या वर्षी त्याने ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे त्याचे मनोबल उंचावले. पुढे त्याने मिस्टर महाराष्ट्रमध्ये सहभागी होत रौप्य पदक पटकावले.

मनोजला मेन्स फिजिक स्पर्धेबद्दल माहिती मिळाली आणि त्याने त्याविषयी गुगल आणि यूट्यूबवर संशोधन सुरू केले. त्याने तिथून तांत्रिक बाबी जाणून घेतल्या आणि 2015 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिकमध्ये भाग घेतला, पण तो टॉप 15 मध्ये प्रवेश करू शकला नव्हता.

मिस्टर इंडिया मेन्स फिजिक स्पर्धेचे विजेतेपद

तेव्हाच त्याने ठरवले, की पुढच्या वर्षी तो नक्कीच विजेतेपद पटकावेल. म्हणून त्याने कठोर परिश्रम करण्यास सुरवात केली आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला पुढच्या वर्षी मिळाले. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.

साहिलने त्याच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. या गाण्याचे नाव ‘नाचेंगे सारी सारी रात’ असे होते. त्याचे हे गाणे सुपरहिट ठरले आणि त्यानंतर साहिलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. साहिलचा ‘स्टाईल’ या चित्रपटातील अभिनय आणि त्याचा लूक चांगलाच गाजला होता. साहिल अभिनित ‘स्टाईल’ या चित्रपटामध्ये शरमन जोशी मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘स्टाईल’मधून शरमन जोशीची कारकीर्द बहरली, मात्र साहिल काही खास जादू दाखवू शकला नाही.

‘स्टाईल’नंतर साहिल ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्लास’, ‘ये है जिंदगी’ अशा केवळ मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसला. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकले नाहीत. दुर्बल कथेमुळे साहिलच्या बॉलिवूड कारकिर्दीचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला.

प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी न मिळाल्यानंतर साहिलने स्वत:ची प्रोडक्शन कंपनी उघडली. या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत गोविंदाचा ‘जिस देश मे गंगा रहता है’ आणि ‘बूम’सारखे चित्रपट बनले. पण हे प्रॉडक्शन हाऊस देखील फार काळ टिकू शकले नाही. साहिलवर फसवणूकीचा आरोप देखील लावण्यात आला होता, ज्यानंतर ते बंद करण्यात आले.

आता बॉडी बिल्डिंगमधून कमवतोय पैसे

बॉलिवूडपासून दूर असलेला साहिल आता बॉडी बिल्डिंगपासून लाखो रुपये कमवत आहेत. त्याने मसल्स अँड बीच नामक जिम चेन सुरू केली आहे. ज्याच्या माध्यमातून तो बक्कळ कमाई करत आहे. बॉलिवूडपासून दूर असलेला साहिल आता बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून लक्झरी आयुष्य जगत आहेत. तो सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फिटनेसचा सल्ला देखील देत राहतो. फिट बॉडीसाठी बरेच लोक साहिलला फॉलो करतात.

संबंधित बातम्या :

Khoya Khoya Chand | ‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI