मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, चित्रा वाघ पोलिसांवर भडकल्या

| Updated on: Aug 04, 2021 | 12:31 PM

संबंधित युवक-युवती कल्याण परिसरातील मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली.

मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, चित्रा वाघ पोलिसांवर भडकल्या
कल्याण मलंगगड परिसरात मारहाण प्रकरणी चित्रा वाघ यांचा संताप
Follow us on

मुंबई : कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी चौघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

“मलंगगडमध्ये काही तरुण-तरुणींना मारहाण झाल्याची बातमी पाहिली. त्यांचा पेहराव हे मारहाणीचं कारण सांगितलं जात आहे. हे काय कपडे घातले आणि कसे घातले? असं स्थानिक मंडळींचं म्हणणं होतं. त्यावरुन वाद झाला आणि मुलं-मुली दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ते त्याच परिस्थितीत नेवाळे पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनीही दखल घेतली नाही, हे तर अतिशय गंभीर आहे. ज्यांनी मारहाण केली त्या समाजकंटकांवर तर कारवाई व्हायलाच हवी, पण ज्यांनी त्याची दखल घेतली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये? कारण ज्यावेळी मुलं-मुली तुमच्याकडे आली, त्यावेळी त्यांच्या हाता-पायाला लागलं होतं. पाठीवर वळ होते. काचेने कापलं होतं. अशी गंभीर परिस्थिती असताना त्यांना दिलासा देणं, तात्काळ गुन्हा नोंद करुन घेणं गरजेचं होतं. राज्यात जर पोलीस संरक्षण देणार नसतील, तर प्रत्येकाने आपल्या हाती शस्त्र बाळगण्याची वेळ आलेली आहे” अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

संबंधित युवक-युवती कल्याण परिसरातील मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली.

“पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ”

अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर नेवाळी पोलीस चौकी गाठली. तेथे या प्रकाराची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही. हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा दावा चौघांनी केला. मात्र, यातील पीडित तरुणीने हिंमत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा :

VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा