प्रियकराचा नवऱ्यावर हल्ला, बचावासाठी मध्ये पडलेली विवाहित प्रेयसी मृत्युमुखी, कोर्टाचा मोठा निकाल

घटनेच्या दोन दिवस अगोदर आरोपीसोबत भांडण झाल्याचे संतोष यांनी कोर्टात सांगितले. वंदना आणि राजू दोघे एका ज्यूस स्टॉलवर काम करत होते. मात्र स्टॉल मालकाच्या मुलाकडून संतोष यांना समजले होते, की त्यांची पत्नी आरोपीसोबत फिरत होती.

प्रियकराचा नवऱ्यावर हल्ला, बचावासाठी मध्ये पडलेली विवाहित प्रेयसी मृत्युमुखी, कोर्टाचा मोठा निकाल
crime News

मुंबई : प्रियकराच्या खुनी हल्ल्यापासून आपल्या पतीला वाचवताना 2016 मध्ये एका 30 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. मुंबईतील ताडदेवचा रहिवासी असलेल्या राजू पाल या 27 वर्षीय तरुणाला दोषी ठरवून शनिवारी सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीने 2016 मध्ये महिलेच्या घरी जाऊन तिचे पती संतोष वानखेडे यांच्यावर चाकूने वार केले होते. संतोष यांना या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाल्याने त्यांनी पत्नी वंदनाला राजूची भेट घेण्यास मनाई केली होती.

कोर्टाने काय सांगितले

“ही धोकादायक शस्त्राने केलेली पूर्वनियोजित आणि भीषण हत्या असल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपी अत्यंत क्रूरपणे वागला होता. आरोपीने सुरुवातीला तक्रारदाराला (संतोष) मारहाण केली आणि जेव्हा त्यांच्या पत्नीने (वंदना) आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्या छातीवर चाकूने वार केला” असं न्यायाधीश संजश्री घरत राजू पाल याला दोषी ठरवताना म्हणाल्या.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या संतोष आणि त्यांच्या मुलीचे मोठे नुकसान झाले आहे. जे आरोपीला शिक्षा देऊन भरुन काढता येणारे नाही. “घटनेच्या वेळी मृत महिलेची अल्पवयीन मुलगी नऊ वर्षांची होती. आईच्या निधनामुळे तिला मूळगावी राहावे लागत आहे. तर वडील उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहतात” असे न्यायालयाने म्हटले आहे. सरकारी वकील कल्पना हिरे यांनी पाल याला दोषी ठरवण्यासाठी संतोष आणि त्यांच्या मुलीसह 12 साक्षीदार सादर केले होते.

आरोपीसोबत आधी पतीचा वाद

घटनेच्या दोन दिवस अगोदर आरोपीसोबत भांडण झाल्याचे संतोष यांनी कोर्टात सांगितले. वंदना आणि राजू दोघे एका ज्यूस स्टॉलवर काम करत होते. मात्र स्टॉल मालकाच्या मुलाकडून संतोष यांना समजले होते, की त्यांची पत्नी आरोपीसोबत फिरत होती.

घटनेच्या दिवशी काय घडलं

संतोष वानखेडे घटनेच्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी 2016 रोजी मध्यरात्री 1.30 वाजता कामावरुन घरी परतले. रात्रीचे जेवण करत असताना कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोठावला. बाहेरून हातात चाकू घेऊन आरोपी राजू पाल आत शिरला आणि त्याने संतोष यांच्या पोटात वार केला. मात्र आपण चाकू पकडून तोडल्याचे संतोष यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या स्वयंपाकघरातून चाकू काढला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची पत्नी वंदना त्याच्या मागे धावत गेली. तेव्हा आरोपीने पत्नीच्या छातीवर वार करून तेथून पळ काढला, असे संतोष यांनी सांगितले.

आपणही आरोपीच्या मागे धावलो, पण त्याला पकडू शकलो नाही, असे संतोष यांनी सांगितले. त्यांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि ते घरी परतले. संतोष आणि पत्नी वंदना यांना त्यांचे मित्र नायर रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती नंतर त्यांना देण्यात आली.

संबंधित बातम्या :

मी भारतीय सैन्यात आहे, लग्न करशील का? पुण्यातील तरुणीवर बलात्कार करुन भामटा परागंदा

सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह शवागारात कुजत, रुग्णालयाने दोन कुटुंबांच्या दुःखावरची खपली काढली

 

Published On - 9:23 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI