सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह शवागारात कुजत, रुग्णालयाने दोन कुटुंबांच्या दुःखावरची खपली काढली

बंगळुरुमधील राजाजीनगर येथील एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अँड मॉडेल हॉस्पिटलमधील कागदपत्रांनुसार, 40 वर्षीय दुर्गा सुमित्रा आणि 50 वर्षीय मुनिराजू गेल्या वर्षी, 2 जुलै 2020 रोजी कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडले होते

सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह शवागारात कुजत, रुग्णालयाने दोन कुटुंबांच्या दुःखावरची खपली काढली
बंगळुरुतील दोन कुटुंबियांना पुन्हा दुःख देणारी बातमी

बंगळुरु : कोव्हिडमुळे आपल्या प्रियजनांना गमावल्याच्या सुमारे सव्वा वर्षांनंतर बंगळुरुमधील दोन कुटुंबांना पुन्हा एकदा वेदनादायक बातमी मिळाली आहे. रुग्णालयाच्या शवागारात त्यांचे मृतदेह तेव्हापासून कुजत पडले असल्याचं समोर आलं आहे. ही वार्ता देत रुग्णालय आणि महापालिकेने एकप्रकारे दोन कुटुंबांच्या दुःखावरची खपलीच काढली आहे.

काय आहे प्रकरण?

बंगळुरुमधील राजाजीनगर येथील एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अँड मॉडेल हॉस्पिटलमधील कागदपत्रांनुसार, 40 वर्षीय दुर्गा सुमित्रा आणि 50 वर्षीय मुनिराजू गेल्या वर्षी, 2 जुलै 2020 रोजी कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडले. त्यावेळी बंगळुरु शहरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत होती आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरही ताण होता. कोरोना संसर्गाच्या जोखमीमुळे मृतांच्या नातेवाईकांना त्यांचं अखेरचं दर्शनही घेता न आल्याची अनेक हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळत होती. तसंच काहीसं सुमित्रा आणि मुनिराजू यांच्या कुटुंबांसोबत घडलं.

त्यावेळी, बंगळुरुमध्ये ब्रुहत बेंगळुरु महानगरा पालिके (BBMP) हॉस्पिटलमधील बेड्सच्या परिस्थितीवर देखरेख करत होती. गरजू लोकांना उपचारासाठी बेड मिळेल, याची खात्री करण्यासाठी खाजगी रुग्णालयांमधील काही बेड्सही त्यांनी ताब्यात घेतले होते.

सव्वा वर्षांनंतर शवागारात मृतदेह सापडले

संबंधित दोन रुग्णांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी संसर्गाचा धोका असल्याचे सांगून आपापल्या प्रियजनांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले नाहीत आणि त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती दिली गेली. जवळपास सव्वा वर्षांनंतर कुटुंबियांना कळवण्यात आले की त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह हॉस्पिटलच्या शवागारातच सडलेल्या अवस्थेत आहेत. हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांनी याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली.

या निष्काळजीमुळे आता रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. हा प्रकार कसा घडला याचा तपास सुरु करण्यात आला आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यापूर्वी कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली जाईल.

मृतांच्या नातेवाईकांना धक्का

“कोव्हिड काळ असल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह आमच्या ताब्यात दिला नव्हता. आम्ही घरी परतलो. काही दिवसांनंतर, आम्हाला ब्रुहत बेंगलुरु महानगर पालिकेकडून कॉल आला, की त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. आता जवळपास 15 महिने उलटले आहेत आणि तीन दिवसांपूर्वी आम्हाला एक फोन आला. ही गोष्ट खरी आहे की खोटी, या विचारानेच आम्ही घाबरलो होतो.” असं मयत सुमित्रा यांची बहीण म्हणाली.

“वडिलांच्या निधनाबाबत आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला. आम्ही त्यांच्याकडे मृतदेह मागितला. पण बीबीएमपीच्या अधिकाऱ्यांनी पार्थिवाववर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. नंतर जेव्हा आम्ही मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला काही कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले” अशी माहिती मयत मुनिराजू यांच्या मुलाने दिली.

दरम्यान, राजाजीनगरचे भाजप आमदार सुरेश कुमार यांनी कर्नाटकचे कामगार मंत्री ए शिवराम हेब्बर यांना पत्र लिहून हे प्रकरण केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे मांडण्याची विनंती केली आहे.

संबंधित बातम्या :

राजस्थानमध्ये लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर 8 वर्षे बलात्कार, आरोपीविरुद्ध तक्रार दाखल

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली द्यायचे मोठमोठे टार्गेट, पूर्ण न केल्यास दंड वसूल करायचे

प्रयागराज हत्याकांड: एकतर्फी प्रेमातून चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा

Published On - 8:05 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI