डोंबिवलीतील बाळ विक्री प्रकरण हिमनगाचं टोक, डॉ. केतन सोनीच्या आश्रमात तब्बल 71 मुलं सापडली

डॉ. सोनीच्या आश्रमात या मुलांची खाण्या-पिण्याची आबाळ होत असून प्रकृतीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यापैकी अनेक मुलांच्या अंगावर जीर्ण-फाटके कपडे होते. या मुलांबाबत कोणतीही कागदोपत्री नोंद सापडलेली नाही. त्यामुळे या मुलांचे आई-वडील कोण, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

डोंबिवलीतील बाळ विक्री प्रकरण हिमनगाचं टोक, डॉ. केतन सोनीच्या आश्रमात तब्बल 71 मुलं सापडली
आरोपी डॉ. केतन सोनी

ठाणे : एक लाख रुपयांमध्ये पाच दिवसाच्या बाळाची विक्री केल्या प्रकरणी डॉक्टरसह आई वडिलांच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात जिल्हा महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने डॉक्टरांच्या आश्रमावर छापा टाकण्यात आला. यावेळी डॉ. केतन सोनी यांच्या आश्रमातून 71 मुलांची सुटका करण्यात आली.

डॉक्टरवर गुन्हा

बेकायदेशीरपणे या मुलांना आश्रमात ठेवल्या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात एकीकडे रामनगर तर दुसरीकडे बाजारपेठ पोलिस तपास करणार आहेत. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना डॉक्टरने आश्रमात डांबून ठेवले होते. डॉक्टर या मुलांचं काय करत होता, याचा तपास पोलिस करणार आहेत.

मुलांच्या पालकांना शोधण्याचे आव्हान

या मुलांची रवानगी भिवंडी आणि उल्हासनगरमधील बालसुधारगृहांमध्ये करण्यात आली आहे. सोनीच्या आश्रमात या मुलांची खाण्या-पिण्याची आबाळ होत असून प्रकृतीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यापैकी अनेक मुलांच्या अंगावर जीर्ण-फाटके कपडे होते. या मुलांबाबत कोणतीही कागदोपत्री नोंद सापडलेली नाही. त्यामुळे या मुलांचे आई-वडील कोण, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

कुठल्या वयोगटातील मुलांचा समावेश?

12 ते 16 वर्ष वयोगटातील – 24 मुलं-मुली
1 ते 14 वर्ष वयोगटातील – 14 मुली
2 ते 10 वर्ष वयोगटातील – 33 मुलं-मुली

प्रकरण उघडकीस कसे आले?

डॉक्टर केतन सोनी याने ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात राहणाऱ्या एका जोडप्याला त्यांचे नवजात बाळ विकण्यास प्रवृत्त केले. त्यांना 1 लाख रुपये देण्याची ऑफरही दिली. दाम्पत्य गरीब असल्याने ते त्यांचे मूल काही गरजू जोडप्यांना विकू शकतात, जे बाळाची चांगली काळजी घेतील, असे डॉक्टरने सुचवले होते. या जोडप्याने सुरुवातीला ही ऑफर स्वीकारली होती.

गणपती मंदिराजवळ बाळ सोपवलं

10 नोव्हेंबर रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर, ते डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्या मुलाच्या मोबदल्यात 1 लाख रुपयांचा सौदा पक्का केला. या जोडप्याने डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळ 15 नोव्हेंबर रोजी बाळाला डॉक्टरांकडे सुपूर्द केले आणि पैसे घेतले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

माय-लेकराची पुनर्भेट

काही दिवसांनी या जोडप्याने माघार घेतली आणि डॉक्टरांना आपले मूल परत करण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांच्या नकारानंतर या जोडप्याने ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधला, त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने राम नगर पोलिसात गुन्हा दाखल केला. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाची आई-वडिलांनी पुनर्भेट घडवून आणण्यासाठी मदत केली.

संबंधित बातम्या :

डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण…

दहावीतील विद्यार्थिनीवर 25 वर्षीय तरुणाचे वार, डोकं धडावेगळं होऊन जागीच गतप्राण

चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या

Published On - 9:09 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI