डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण…

अनिश बेंद्रे

|

Updated on: Nov 26, 2021 | 12:07 PM

डॉक्टरांनी डोंबिवली शहरात राहणाऱ्या संबंधित जोडप्याला त्यांचे नवजात बाळ विकण्यास कथितरित्या प्रवृत्त केले. त्यांना 1 लाख रुपये देण्याची ऑफरही दिली. या जोडप्याने सुरुवातीला ही ऑफर स्वीकारली होती; मात्र त्यांनी नंतर माघार घेतली

डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण...
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us

डोंबिवली : 1 लाख रुपयांना अर्भकाची विक्री केल्याप्रकरणी डोंबिवलीतील राम नगर पोलिसांनी डॉक्टर आणि एका जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या तिघांवर बाल न्याय कायदा, 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 (योग्य दत्तक प्रक्रियेशिवाय मूल देणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

डॉक्टरांनी डोंबिवली शहरात राहणाऱ्या संबंधित जोडप्याला त्यांचे नवजात बाळ विकण्यास कथितरित्या प्रवृत्त केले. त्यांना 1 लाख रुपये देण्याची ऑफरही दिली. या जोडप्याने सुरुवातीला ही ऑफर स्वीकारली होती; मात्र त्यांनी नंतर माघार घेतली आणि डॉक्टरांना आपले मूल परत करण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. डॉक्टरच्या नकारानंतर या जोडप्याने ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधला, त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने राम नगर पोलिसात गुन्हा दाखल केला.

डॉक्टरची ऑफर

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 28 वर्षीय बाळंतीण तिचा 30 वर्षीय पती हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरातील रहिवासी आहेत. महिला गरोदर असताना ते होमिओपॅथिक डॉक्टरला भेटले. दाम्पत्य गरीब असल्याने ते त्यांचे मूल काही गरजू जोडप्यांना विकू शकतात, जे बाळाची चांगली काळजी घेतील, असे डॉक्टरने सुचवल्याचा दावा केला जातो.

गणपती मंदिराजवळ बाळ सोपवलं

10 नोव्हेंबर रोजी महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर, ते डॉक्टरांना भेटले आणि त्यांच्या मुलाच्या मोबदल्यात 1 लाख रुपयांचा सौदा पक्का केला. या जोडप्याने डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळ 15 नोव्हेंबर रोजी बाळाला डॉक्टरांकडे सुपूर्द केले आणि पैसे घेतले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

डॉक्टरांचा बाळ परत करण्यास नकार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. सांडभोर यांच्या माहितीनुसार, नंतर त्या जोडप्याने पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन त्यांचे मूल परत करण्याची विनंती केली. दाम्पत्याने त्यापैकी निम्मी रक्कम वापरली होती. डॉक्टरांनी बाळ परत करण्यास नकार दिल्याने कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे धाव घेतली. आम्ही तिघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळाची आई-वडिलांनी पुनर्भेट घडवून आणण्यासाठी मदत केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की “कुटुंब आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आम्ही सर्व कागदपत्रे तपासत आहोत. याआधी अशा कोणत्याही व्यवहारात डॉक्टरांचा सहभाग होता का याचाही आम्ही तपास करत आहोत.”

संबंधित बातम्या :

दहावीतील विद्यार्थिनीवर 25 वर्षीय तरुणाचे वार, डोकं धडावेगळं होऊन जागीच गतप्राण

चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या

नाशकात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI