हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा राडा, लॉज मालकास मारहाण, स्कॉर्पियोखाली लॉज मालकाच्या बहिणीस चिरडले
Harihareshwar Beach Crime: मारहाण करून पळून जात असताना हॉटेल मालकाची बहीण ज्योती हिला गाडी खाली चिरडले. यावेळी गाडीतील एकजण स्थानिक लोकांच्या हाती लागला. परंतु बाकीचे पर्यटक गाडीसह पळून गेले.
Harihareshwar Beach Crime: कोकणातील हरिहरेश्वर येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. राज्यभरातून नाही तर देशभरातून पर्यटक या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथून आलेल्या पर्यटकांनी मद्याच्या नशेत धिंगाणा केला. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी लॉज मालकास मारहाण केली. ते पर्यंटक येथेच थांबले नाहीत. त्यांनी लॉज मालकांच्या बहिणीच्या अंगावर स्कॉर्पियो टाकली. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर ते पर्यंटक फरार झाले. ज्योती धामणस्कर असे मृत महिलेचे नाव आहे. किरकोळ वादावरुन पर्यंटकांनी हा राडा केला.
काय घडला प्रकार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वर मंदिर परिसरात जेवण, राहण्याची व्यवस्था करणारे अनेक हॉटेल्स आहेत. त्या ठिकाणी पुण्यातील पर्यटक आले. त्यांनी हरिहरेश्वर येथील हॉटेल ममता येथे जाऊन खोलीसाठी विचारणा केली. त्यावेळी खोलीच्या भाड्यासंदर्भात त्यांचा मालकाशी वाद झाला. मग दारूच्या नशेत असणाऱ्या त्या पर्यटकांनी हॉटेलचे मालक अभी धामणस्कर यांना बेदम मारहाण केली.
मारहाण करून पळून जात असताना त्यांची बहीण ज्योती हिला गाडी खाली चिरडले. यावेळी गाडीतील एकजण स्थानिक लोकांच्या हाती लागला. परंतु बाकीचे पर्यटक गाडीसह पळून गेले. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडली आहे.
पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात
हरिहरेश्वर हे कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी दारुच्या नशेत पर्यटकांनी केलेला गोंधळामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी एका जणाला तब्यात घेतले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.