वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या

वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात झाला. या घातपातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या पाच तासात सहा आरोपींना बेड्या ठोकल्या.

वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या
प्रातिनिधिक फोटो

यवतमाळ : आर्णी मार्गावर पल्लवी लॉनसमोर वर्चस्वाच्या वादातून शस्त्राने वार करून दुहेरी हत्याकांडाची घटना मंगळवारी (12 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात अवधुतवाडी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या पाच तासात नेताजी नगरातील एका सामाजिक कार्यकर्त्यासह सहा जणांना अटक केली आहे. वसीम पठाण दिलावर पठाण (वय 36), उमेश तुळशीराम येरमे (वय 34) अशी मृतांची नावे आहेत. काल रात्री त्यांच्यावर हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील आरोपी नीरज वाघमारे, छोटे खान, अन्वर खान पठाण, शेख रहेमान, शेख जब्बार, नितीन बाबाराव पवार यांच्यासह एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी पहाटे अटक
केली.

मृतक वसीमच्या पत्नीची पोलिसात तक्रार

मृतक वसीमची पत्नी निखत पठाण हिने दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध अवधूत वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम पठाण याचा काही दिवसांपूर्वी नीरज वाघमारेच्या कार्यालयासमोर शेख रहेमान याच्यासोबत भांडण झाले होते. यावेळी नीरज वाघमारेने वसीमला समजावून सांग नाही तर काटा काढतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर 15 दिवसांनी वसीम पठाण याने छोटू खान याच्याशी वाद घातला. तेव्हाही छोटू खानने वसीमला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नीरज वाघमारे आणि छोटू खान यांनी कट रचून शेख रहेमानच्या हाताने हे हत्याकांड घडवून आणलं, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

वसीम पठाण याला काल रात्री फोन करून भांडण मिटविण्यासाठी बोलावण्यात आले होते. शेख रहेमान, वसीम पठाण, उमेश येरमे, नीलेश उईके, नितीन पवार आणि अल्पवयीन बालक हे सहा जण दोन दुचाकीवरुन आर्णी मार्गावरील एका बारमध्ये दारू प्यायले. नंतर जेवण करण्यासाठी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर गेले. जेवतानाच वसीम आणि रहेमानमध्ये वाद झाला. नंतर उमेश येरमे हा चालत वनवासी मारोती परिसरात आला. उमेशला शोधण्यासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. त्यांनी लोखंडी रॉडने उमेशवर हल्ला चढवत त्याला ठार केले.

आरोपी नीरज वाघमारेची स्वाभिमानी पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष

घटनास्थळवरुन वसीमने पळ काढला तर पाठलाग करुन त्याच्यावरही सपासप वार करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) येथील खंडाळा या गावात अटक केली. नीरज वाघमारे व छोटे खान या दोघांना घरून पकडण्यात आले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या खून प्रकरणात आरोपी असलेला नीरज वाघमारे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. याआधी तो स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता. त्याने नेताजी नगर भागातून पुढे होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून तो प्रकाशझोतात आला होता. आता या पुढाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

लग्नानंतर प्रेमी जोडप्याची विष प्राशन करुन आत्महत्या, प्रियकराचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे कारण

नात्याची राखरांगोळी, बापाकडून बलात्कार, नंतर राजकीय नेत्यांकडूनही अत्याचार, अल्पवयीन पीडितेचे 25 पेक्षा जास्त जणांवर बलात्काराचे आरोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI