#क्राईम_किस्से Laila Khan | अभिनेत्री लैला खानसह कुटुंबातील सहा जणांची झालेली हत्या, इगतपुरीतील बंगल्यामागे सावत्र वडिलांनीच पुरलं

अनिश बेंद्रे

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 7:58 AM

30 जानेवारी 2011 च्या रात्री अभिनेत्री लैला खान ही तिची आई सेलिना, मोठी बहीण हश्मिना, जुळी भावंडे इम्रान आणि झारा आणि चुलत बहीण रेश्मा यांच्यासह इगतपुरी येथील त्यांच्या हॉलिडे होमला गेली होती. यानंतर संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारक पद्धतीने गायब झालं होतं.

#क्राईम_किस्से Laila Khan | अभिनेत्री लैला खानसह कुटुंबातील सहा जणांची झालेली हत्या, इगतपुरीतील बंगल्यामागे सावत्र वडिलांनीच पुरलं
Laila Khan
Follow us

मुंबई : पाकिस्तानात जन्म झालेली अभिनेत्री लैला खान (Laila Khan) हिची जवळपास दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सहकुटुंब हत्या करण्यात आली होती. फेब्रुवारी 2011 मध्ये लैला खान, तिची आई सेलिना, मोठी बहीण, जुळी भावंडं असे एकाच कुटुंबातील सहा सदस्य बेपत्ता झाले होते. लैलाच्या सावत्र वडिलांनीच संपूर्ण कुटुंबाला गोळी झाडून संपवल्याचं पोलीस तपासात समोर आलं. नाशिकजवळ इगतपुरीतील फार्महाऊसच्या मागच्या बाजूला या सर्वांचे मृतदेह पुरण्यात आले होते.

कोण होती लैला खान?

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत 2008 मध्ये ‘वफा’ चित्रपटातील भूमिकेमुळे लैला खान नावारुपास आली होती. त्यानंतर तिचा ‘फरार’ नावाचा एक सिनेमाही येऊन गेला. लैला खानचं मूळ नाव रेश्मा पटेल (Reshma Patel). तिचा विवाह मुनीर खान (Munir Khan) याच्याशी झाला होता. मुनीर हा ‘हरकत-उल-जिहाद अल इस्लामी’ (Harkat-ul-Jihad al-Islami) या बंदी असलेल्या बांगलादेशी संघटनेचा सदस्य होता. लैला खानने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेला मुंबई शहराची माहिती देऊन हल्ल्याची योजना आखल्याचाही आरोप झाला होता.

फेब्रुवारी 2011 मध्ये बेपत्ता

30 जानेवारी 2011 च्या रात्री लैला खान ही तिची आई सेलिना, मोठी बहीण हश्मिना, जुळी भावंडे इम्रान आणि झारा आणि चुलत बहीण रेश्मा यांच्यासह मुंबईपासून 126 किमी उत्तरेस असलेल्या इगतपुरी येथील त्यांच्या हॉलिडे होमला गेली होती. 9 फेब्रुवारी 2011 रोजी लैलाची आई आपली बहीण अल्बाना पटेल यांच्याशी फोनवरही बोलली होती. आपण तिसरे पती परवेझ इक्बाल टाक (Pervez Iqbal Tak) यांच्यासोबत चंदिगढमध्ये असल्याचं सेलिना यांनी बहिणीला सांगितलं होतं. यानंतर संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारक पद्धतीने गायब झालं होतं.

लैला बेपत्ता असल्याची तक्रार

लैला खानचे सख्खे वडील नादिर शाह पटेल (सेलिनाचे पहिले पती) यांनी मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपली मुलगी कुटुंबातील इतर सदस्यांसह बेपत्ता झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राकेश सावंत यांनीही अशीच तक्रार दाखल केली होती. कारण मुंबईतून गायब होण्याआधी लैला खान त्यांच्यासोबत जिन्नत या चित्रपटाचे शूटिंग करत होती.

लैला खानचे सावत्र वडील परवेझ इक्बाल टाक (लैलाची आई सेलिनाचा तिसरा नवरा, जो लष्कर-ए-तैयबाचा सदस्य असल्याचाही संशय आहे) तसेच आसिफ शेख (लैलाची आई सेलिनाचा दुसरा नवरा) हे लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या बेपत्ता होण्यामागे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सख्खे वडील नादिर शाह पटेल यांचीही चौकशी केली होती.

सावत्र बाप परवेझला अटक

21 जून 2012 रोजी जम्मू -काश्मीर पोलिसांनी परवेझ इक्बाल टाक याला दुसऱ्या केसमध्ये अटक केली होती. चौकशी दरम्यान परवेझने कबूल केले, की लैला खान आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्यांना फेब्रुवारी 2011 मध्ये महाराष्ट्रात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. दुसऱ्या दिवशी परवेझने आपला जबाब मागे घेतला, त्याऐवजी लैला आणि तिचे कुटुंबीय जिवंत असल्याचा दावा केला. त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने परवेझला मुंबईत आणले. त्याला 10 जुलै 2012 रोजी एस्प्लेनेड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने परवेझला 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेसमोर कबुली देताना परवेझने तिसऱ्यांदा आपले विधान बदलले. लैला खानची आई सेलिना सतत अपमानित करत असल्यामुळे आणि तिचे इतर पुरुषांशी संबंध असल्यामुळे आपला तिला ठार मारण्याचा हेतू होता, असा दावा त्याने केला.

लैलासह सहा जणांच्या हत्येची कबुली

अखेर, परवेझने चौकशीकर्त्यांना सांगितले की त्याने आपल्या साथीदारांसह लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह तिच्या इगतपुरीतील बंगल्यामागे पुरले. लैलाने आपल्याला तिच्या आईची हत्या करताना पाहिलं होतं. साक्षीदार मिटवण्यासाठी सर्वांचाच खून केल्याची कबुली त्याने दिली होती. परवेझच्या सततच्या बदलत्या विधानांमुळे, मुंबई पोलीस त्याच्या साक्षीवर पूर्ण विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. चौकशीदरम्यान केलेल्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी परवेझला इगतपुरी येथे नेण्यात आले.

दरम्यान, लैलाची आई सेलिनाचा दुसरा नवरा आसिफ शेखला बंगळुरु येथून अटक करण्यात आली. परवेझ आणि आपण लैला खान आणि तिच्या कुटुंबाला ठार केल्याची कबुली शेखने दिली. आसिफ शेखचे नाव परवेझने त्याच्या पूर्वीच्या कबुलीजबाबामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांसमोर घेतले होते. लैला खानच्या इगतपुरीतील बंगल्याची तपासणी करताना, पोलिस तपास पथकाला सहा पुरलेले मृतदेह सापडले, जे लैला खान आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे असल्याचे नंतर डीएनए टेस्टमध्ये स्पष्ट झाले.

हत्येचं कारण काय

पैसे, मालमत्ता, मत्सर आणि कुटुंबाची दुबईला स्थलांतरित होण्याची योजना हे लैला खान आणि कुटुंबाच्या हत्येचे कारण मानले जाते. तपासात असे दिसून आले की, परवेझचा नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन होता. जिथे लष्कर-ए-तैयबाशी असलेल्या संबंधांमुळे त्याला अटक टाळण्यास मदत झाली असती. मात्र नेपाळला पळून जाण्यापूर्वीच त्याला जम्मू -काश्मीर पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणात अटक केली आणि हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.

संबंधित बातम्या :

Naina Sahni Tandoor Murder | विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या, नैना साहनीच्या शरीराचे तुकडे तंदूरमध्ये जाळले

Sandhya Singh | जतीन-ललितच्या बहिणीची झालेली हत्या, मुलानेच मृतदेह अ‍ॅसिडमध्ये विरघळवल्याचा होता संशय

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI