Navi Mumbai Crime : कंडक्टर महिलेला बसमधून उतरायला मदत करत होता, तेवढ्यात ट्रकची जोरदार धडक बसली आणि…
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर रसायनी पोलीस चौकीजवळ शुक्रवारी रात्री उशीराच्या सुमारास हा अपघात झाला. मृत कंडक्टर हे एका प्रवासी महिलेला खाली उतरण्यासाठी मदत करत होते. तेव्हाच एक ट्रक वेगाने आला आणि बसला धडकला.

नवी मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : नवी मुंबईतील रसायनी जवळ हे एक दुर्दैवी अपघात (acccident) घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बसला ट्रकची जोरदार धडक बसल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू (bus conductor died) झाला. तर बस ड्रायव्हरच्या डोक्यालाही (bus driver injured) दुखापत झाली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर रसायनी पोलीस चौकीजवळ शुक्रवारी रात्री उशीराच्या सुमारास हा अपघात झाला. मृत कंडक्टर हे एका प्रवासी महिलेला खाली उतरण्यासाठी मदत करत होते. तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली.
कंटेनर ट्रकची भीषण धडक
शिवराज राम माळी असे मृत कंडक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर ट्रकने बसला धडक दिली तेव्हा माळी हे एका महिला प्रवाशाला खाली उतरण्यास मदत करत होते. तेवढ्यात मागून वेगाने ट्रक आला आणि बसला भीषण धडक बसली. या घटनेत बसचे ड्रायव्हर अथवा चालक प्रदीप लक्ष्मण सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रसायनी पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकच्या धडकेत मोटारसायकवरून जाणाऱ्या तरूणीचा मृत्यू
रस्ते अपघाताचा आणखी एक दुर्दैवी प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला. पनवेलमधील करंजाडे येथील वडघर परिसरातील खाडी पुलाजवळ 20 सप्टेंबर रोजी एक दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. प्राची वानखेडे असे मृत तरूणीचे नाव असून ती मोटारसायकलवरून जात असताना टँकरची जोरदार धडक बसली. त्यामध्ये तिला जीव गमवावा लागला.
मृत तरूणी प्राची वानखेडे ही करंजाडे येथील सेक्टर 5 ए येथील विनायक आंगण येथील रहिवासी होती. 20 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 च्या सुमारास प्राची ही जुई नगर येथे राहणाऱ्या फोटोग्राफर अनिकेत ठाकूरसोबत ( वय १७) करंजाडे येथे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला.
पनवेल शहर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. बेदरकारपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला.
