
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. कधी बलात्कार त्यानंतर हत्येमुळे मुलींना जीव गमवावा लागत आहे. तर कधी सासरच्या जाचाला कंटाळून आणि सतत हुंड्याची मागणी होत असल्यामुळे महिला आत्महत्या करतात किंवा मग त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं. असंच काही ग्रेटर नॉएडामध्ये झालं आहे. . हुंड्याच्या छळामुळे ग्रेटर नोएडामध्ये निक्कीला तिचा पती विपिन आणि सासरच्या लोकांनी जाळून मारल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ज्वलनशील पदार्थ (थिनर) टाकून विपिन याने पत्नी निक्की हिची हत्या केली आहे. गेल्या एक महिन्यापासून निक्की हिला मारण्यासाठी योजना आखली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, विपिन याने एक महिन्यापूर्वी दिल्ली येथील एका दुकानातून थिनर विकत आणलं होतं. निक्की हिला पतीने अनेकदा मारहाण देखील केली आहे…
गावकऱ्यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानुसार, विपिन कोणतंच काम करत नव्हात. रात्री कायम डिस्कोमध्ये जायचा. घर खर्चासाठी त्याने निक्कीला पैसे देणं देखील बंद केलं होतं. निक्की हिने अनेकदा वडिलांकडून देखील पैसे मागितले होते. अशात घरातच ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करत निक्की हिने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ब्यूटी पार्लरचं कारण सांगत विपिन याने थिनर विकत घेतलं होतं.
निक्कीच्या बहिणीचा आरोप आहे की, विपिन याला जुगार खेळण्याची आणि डिस्कोमध्ये जाण्याचीही आवड होती. काहीही कमावण्याऐवजी तो निक्कीच्या ब्युटी पार्लरमधील कमाई त्याच्या व्यभिचारावर खर्च करायचा. त्यामुळे घरात वारंवार भांडणं व्हायची. कुटुंबाने आरोपी पतीवर एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोपही केला आहे.
निक्कीची बहीण कांचन हिने दिलेल्या माहितीनुसार, निक्की हिला जाळण्याआधी त्यांचं भांडण झालं होतं. भांडणाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भांडण सुरु असताना निक्की हिला मारहाण देखील करण्यात आली. आजारपणामुळे, कांचनने डॉक्टरांना बोलावलं होतं आणि तिच्या हातात ड्रिप लावला होता.
त्यानंतर कांचन हिला वरून आवाज ऐकू येऊ लागला, “मला मारून टाका, मला संपवा.” जेव्हा तिने ड्रिप काढून घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा ज्वाळांनी वेढलेली निक्की पायऱ्यांवरून खाली येत होती आणि तिच्या पती-सासूकडून जीवनाची याचना करत होती. बहिणीला जळताना पाहून कांचन हिने आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला. पण डोळ्यासमोर हृदयद्रावक घटना घडत आहे पाहाताच कांचन देखील बेशुद्ध पडली.
निक्कीचे काका राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी निक्कीने तिच्या पतीला एका मुलीसोबत रंगेहाथ पकडणलं होतं. निक्कीने तिच्या आई – वडिलांना याबद्दल कळवलं देखील होतं. यावर कुटुंबियांची बैठक देखील झाली. त्यावेळी, सामाजिक लाज आणि आरोपी पतीने माफी मागितल्यामुळे प्रकरण मिटलं. पण त्याच्या मनातील आग शांत झाली नव्हती. अखेर त्या आगीमध्येच निक्कीने स्वतःचे प्राण गमावले.