Phaltan Doctor Death Case : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिला डॉक्टरसोबत प्रशांत बनकरच्या घरी काय घडलेलं? महत्वाची माहिती आली समोर
Phaltan Doctor Death Case : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महत्वाची माहित दिली आहे. आयसी कमिटीने या बाबतीत महत्वाची माहिती दिली आहे.

सध्या संपूर्ण राज्यात फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. या प्रकरणात गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं येत आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या प्रकरणात माहिती देताना काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आणखी एक बाजू समोर आली आहे.
“पोलिसांनी या प्रकरणात मोबाइलचे सीडीआर काढले. त्यात गोपाल बदनेसोबत जानेवारी ते मार्चपर्यंत संवाद आहे. त्यानंतर संवाद नाही. प्रशांत बनकर सोबत संवाद कायम होता. लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या. फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला. फोटो नीट आले नाही म्हणून भांडण झालं. त्यानंतर त्या घरातून निघाल्या. बनकरच्या वडिलांनी तिला समजावलं. त्यानंतर त्या हॉटेलला गेल्या. तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले. त्याचा फोन बंद होता. मी आत्महत्या करेल वगैरे मेसेज केले होते. यापूर्वीही तू आत्महत्येची धमकी दिली होती” असं प्रशांतने तिला म्हटलं होतं.
दिवाळीही त्यांनी चांगली एन्जॉय केली
“आज किंवा उद्या पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी समोर येतील. मी आयसी कमिटीला बोलावलं होतं. कमिटीचे सर्व मेंबर डॉक्टर महिलेसोबतच काम करत होते. एकत्र टिफिन खाण्यापासून ते दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत सर्व एकत्रच होते. तिच्यावर दबाव आहे किंवा फिट अनफिट प्रमाणपत्र द्यावं किंवा कोणता मानसिक त्रास आहे, असं कधी डॉक्टरने सांगितलं नाही, असं या कमिटीच्या सदस्यांनी सांगितलं. आम्ही सोबत राहत होतो. जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत. दिवाळीही त्यांनी चांगली एन्जॉय केली. असंही या मेंबरनी सांगितलं” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
