Raja Raghuvanshi Murder : याच गोष्टीने घेतला राजाचा जीव… विशालने केला वार, सोनम शेजारीच उभी ! त्या शस्त्राचा फोटो समोर
राजा रघुवंशीच्या हत्येत वापरलेले शस्त्र हे मारेकऱ्यांनी गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळून विकत घेतले होते. शिलाँगमध्ये सोनमच्या सूचनेवरून विशालने प्रथम राजावर हल्ला केला. त्यानंतर आनंद आणि आकाशच्या मदतीने राजाची हत्या करून त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.

लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांच्या पतीची निर्घृण हत्या करवणारी सोनम रघुवंशी आणि इतर मारेकरी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या अटकेनंतर रोज नवनवे खुलासे होते आहेत. राजा रघुवंशी हत्याकांड सध्या संपूर्ण देशात गाजत आहे. दरम्यान या खुनासाठी वापरलेल्या शस्त्राचा फोटो अखेर समोर आला आहे. मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या याच शस्त्राने करण्यात आली होती. या शस्त्राने राजावर अनेक हल्ले करण्यात आले. सूत्रांच्या सांगण्यानुसार, या हल्ल्यादरम्यान राजाने स्वतःला वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळेच आकाशच्या शर्टवर रक्ताचे डाग होते. आरोपींनी हे शस्त्र गुवाहाटी रेल्वे स्थानकाजवळून खरेदी केले होते, असे शिलाँग पोलिसांनी सांगितलं.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील पाच आरोपी, सोनम रघुवंशी, राज कुशवाह, विशाल उर्फ विक्की ठाकूर, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत हे सध्या शिलाँग पोलिसांच्या ताब्यात आहेत. हत्येची कारणे शोधण्यासाठी पोलिस पाचही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह याने या संपूर्ण हत्येची योजना आखल्याचा आरोप आहे. राज हाच या हत्येचा सूत्रधार असल्याचे मानले जाते. मात्र हत्येच्या या नियोजनात सोनमचाही सहभाग होता.

याच शस्त्राने झाली राजाची हत्या
राज कुशवाह मास्टरमाईंड
राजा रघुवंशी याला मारण्यासाठी राज कुशवाहने त्याच्या तीन मित्रांना तयार केले. हे तीन मित्र विशाल, आनंद आणि आकाश होते. त्यांनी शिलाँगमध्ये जाऊन राजाची हत्या केली. या लोकांनी गुवाहाटी रेल्वे स्थानकाजवळून हत्येत वापरलेले शस्त्र खरेदी केलं होतं. सोनमच्या सूचनेनुसार शिलाँगमध्ये विशालने प्रथम राजावर हल्ला केला. नंतर आनंद आणि आकाशच्या मदतीने त्याने राजाला मारले आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला. त्यानंतर मारेकरी आपापल्या घरी निघून गेले. आणि सोनमही तेथून फरार झाली.
गाझीपूरमध्ये सापडली सोनम
हनीमूनला गेल्यानंतर गायब झालेल्या राजाचा मृतदेह 2 जून रोजी शिलाँगमधील एका दरीत सापडला. तर 8 जून रोजी रात्री उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील एका ढाब्यावर सोनम सापडली. त्यानंतर राज, आनंद आणि विशाल यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली, तर आकाशला उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत.
23 मे ला झाली राजची हत्या
गेल्या महिन्यात ११ मे रोजी राजा रघुवंशी याचे इंदौर येथील सोनम रघुवंशी हिच्याशी लग्न झाले होते. 20 मे रोजी दोघेही हनिमून ट्रिपसाठी निघाले. प्रथम दोघांनीही कामाख्या देवीचे दर्शन घेतले आणि नंतर शिलाँगला पोहोचले. 23 मे रोजी शिलाँगमध्ये राजा याची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येचे प्रकरण खूप चर्चेत आलं. सुरुवातीला असे वाटले होते की दोघांचेही अपहरण झालंय. नंतर जेव्हा राजाचा मृतदेह सापडला तेव्हा कुटुंबीय सोनमच्या बेपत्ता होण्याबद्दल आणि तिच्या अपहरणाबद्दल बोलू लागले, परंतु जेव्हा सोनम पकडली गेली तेव्हा एक वेगळीच कहाणी समोर आली. तिनेच राजाची हत्या करवल्याचं उघड झालं आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.
