त्रिशुळने घेतला चिमुकल्याचा बळी: दीर-भावजयच्या भांडणात मातेने गमावले पोटचे पोर, पुण्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला
पुण्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथे नवऱ्या-बायकोच्या भांडणात एका ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा त्रिशूळ लागून दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीने रागाच्या भरात पतीला मारण्यासाठी फेकलेले त्रिशूळ चिमुकल्याला लागले.

पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथे नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पती-पत्नीमधील वादात बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी फेकलेला त्रिशूळ बाजूलाच असलेल्या ११ महिन्यांच्या पुतण्याला लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवधूत मेंगवडे (११ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागे अंधश्रद्धेचा संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
त्रिशूळ चिमुरड्याला लागून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव येथील सचिन मेंगवडे यांचे त्यांच्या पत्नीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेले. यानंतर पत्नीने रागाच्या भरात पतीला मारण्यासाठी हातात असलेला त्रिशूळ फेकला. मात्र, दुर्दैवाने तो त्रिशूळ पतीच्या बाजूलाच असलेल्या भावजय भाग्यश्री मेंगवडे यांच्या कडेवर असलेल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्या अवधूतला लागला. हा त्रिशूळ लागल्याने अवधूत गंभीर जखमी झाला.
त्यानंतर तातडीने चिमुकल्या अवधूतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नवरा-बायकोच्या भांडणात एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याने केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय?
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी भाग्यश्री सचिन मेंगावडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माझे दीर नितीन मेंगावडे आणि त्यांची पत्नी पल्लवी मेंगावडे यांचे घरात जोरजोरात भांडण चालू होते. यावेळी मी माझ्या लहान मुलाला कडेवर घेऊन त्या दोघांची भांडणं सोडवण्यासाठी गेले. यावेळी पल्लवी यांनी त्रिशुळ फेकून मारला. हा त्रिशुळ माझा लहान मुलगा अवधूत याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला लागला आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी घटनास्थळावर पडलेले रक्त आणि त्रिशुळची साफसफाई करुन पुरावा नष्ट केला, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांना या घटनेमागे काहीतरी वेगळाच संशय येत आहे. हा प्रकार केवळ कौटुंबिक वाद आहे की या घटनेला काही अंधश्रद्धेची किनार आहे, या दृष्टीने पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांच्या पुढील तपासातूनच या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होईल.
