मध्यरात्रीच हंडा उघड… महिलेला सांगितलं असं काही; पुण्यातील भोंदू बाबा निघाला भलताच चालू
पुण्यात एका भोंदू बाबाने सोन्याच्या हंड्याचे आमिष दाखवून एका महिलेची 2.6 लाख रुपयांची फसवणूक केली. कोथरूडमधील या महिलेला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देऊन बाबाने पूजेच्या नावाखाली पैसे घेतले.

विद्येचं माहेर अशी ख्याती असलेलं पुणं सध्या गुन्ह्यांमुळेच गाजतयं. कधी चोरी, दरोडा, खून तर कधी अत्याचार अशा एक ना अनेक गुन्ह्यांच्या घटना पुण्यातून समोर येतच असतात. आता त्याच पुण्यातून आणखी एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या महिलेला सोन्याचा हंडा देतो असे आमिष दाखवत एका भोंदू बाबाने तिची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी मदारी बाबाने जादूटणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महंमद खान साहेब जानमदारी असे ताब्यात घेतलेल्या जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे. त्याने त्या महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली पीडित महिला ही पुण्यातील कोथरूड परिसरात राहते. एका मैत्रिणीमुळे त्या महिलेची या भोंदू बाबाशी ओळख झाली. तिची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन त्याने दिलं. त्याने सोन्याचे हांडे मिळून देण्याचं आमिष त्या महिलेला दाखवलं. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. सोन्याचा हंडा देतो, पण त्यासाठी पूजेचा घाट घालावा लागेल असे त्या भोंदू बाबाने त्या महिलेला सांगितलं. आणि त्या पूजेसाठी त्याने तिच्याकडून 2 लाख 60 हजार रुपये उकळले.
अघोरी पूजा तर केली पण…
जादूटोणा करणाऱ्या महंमद खान साहेब जानमदारी या बाबाने पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या स्वतःच्या घरी पूजा करत त्या महिलेला एका मातीचं मडकं आणि त्यावर विशिष्ट रंगाचा कापड तिला दिलं. तसेच त्या मडक्यावरील काळा कपडा 17 दिवसांनी रात्री अकरा वाजून 21 मिनिटांनी उघडण्यास त्या भोंदू बाबाने सांगितलं. अखेर त्या महिलेने 17 दिवसानंतर हा कपडा उघडला, पण तिच्या हातात फक्त मातीच लागली, सोनंबिनं काहीच मिळालं नाही. हातात आलेली माती पाहून आपली फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आलं आणि तिने डोक्याला हात मारहाल. अखेर तिने या फसवणुकीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास करत फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या ठोकत अटक केली.
