पुणे : पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Rajesh Puranik) यांच्या दादागिरीला व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल (Viral) झाल्यानंतर राज्य महिला आयोगा (State Women Commission)ने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत एका महिलेने केलेल्या तक्रारीवर आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना संबंधित प्रकाराचा कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आयोगाच्या या भूमिकेमुळे पुराणिक यांच्या संकटात मोठी भर पडली असून त्यांच्यावर पोलीस खात्याकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. निष्पाप नागरिकांना अमानुष पद्धतीने मारहाण तसेच अत्यंत अर्वाच्च शब्दांत केलेल्या शिवीगाळमुळे पुराणिक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या दादागिरीविरोधात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. याचदरम्यान महिला आयोगाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपासाचे निर्देश दिले आहेत.