पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, विशाल अग्रवालला जामीन मंजूर, पण सुटका नाहीच
पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाने काही अटीशर्तींवर विशाल अग्रवालला जामीन मंजूर केला आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाने काही अटीशर्तींवर विशाल अग्रवालला जामीन मंजूर केला आहे. विशाल अग्रवालला आज जामीन मंजूर झाला असला तरी त्याला तपास यंत्रणांना तपासासाठी सहकार्य करावं लागणार आहे. याच अटीच्या आधारावर विशाल अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे. असं असलं तरीही विशाल अग्रवालची आज सुटका झालेली नाही. त्याची रवानगी आज पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
विशाल अग्रवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. मात्र इतर दोन गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे. विशाल अगरवला याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. मुलगा अल्पवयीन आहे आणि दारूच्या नशेत होता. विशाल अग्रवालवरती येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात विशाल अग्रवाल याला जामीन देण्यात आलाय.
कोर्टात नेमकं काय घडलं?
पुण्यातील कार अपघात प्रकरणी महत्त्त्वाची माहिती समोर येत आहे. रक्त चाचणी फेरफार प्रकरणात आज विशाल अग्रवाल, त्याची पत्नी शिवाणी अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांना पोलिसांनी आज कोर्टात हजर केलं. त्यांची आज पोलीस कोठडी संपत होती. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पुणे पोलिसांनी यावेळी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. रक्त चाचणीत फेरफार करून पुरावा नष्ट करण्यासाठी एक बैठक झाली. त्या बैठकीला अग्रवाल दाम्पत्य आणि अश्पाक मकानदार यांच्यात बैठक झाली. ती बैठक कुठे झाली आणि त्या बैठकीतून अजय तावरेला संपर्क झाला का? याचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे आम्हाला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद पुणे पोलिसांकडून आज कोर्टात करण्यात आला.
