पत्नीला सिगरेटचे चटके, अघोरी प्रयोगाने छळ, अखेर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

रणजीत जाधव

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 10:19 PM

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर काही दिवसांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पत्नीला सिगरेटचे चटके, अघोरी प्रयोगाने छळ, अखेर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई
गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड

पुणे : अखेर दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेले फरार आरोपी प्रसिद्ध उद्योगपती गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांना उडपीमधून अटक करण्यात आली आहे. पत्नीला सिगरेटचे चटके देऊन मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे देखील दाखल दाखल करण्यात आले होते. अखेर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गायकवाड कुटुंबावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या गायकवाड कुटुंबीयांची औंधमध्ये कोट्यवधींची मालमत्ता आहे.

आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर काही दिवसांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पण आकोपी फरार होते. त्यांचा तपास पोलीस करत होते. अखेर त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी गायकवाड पिता-पुत्रांना उडपीमधून अटक केली आहे.

गायकवाड पिता-पुत्रांवर आठ गुन्हे दाखल

नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड याच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याने ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला. गणेश गायकवाड याने आपल्या 27 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली होती. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. विशेष म्हणजे गणेश गायकवाड याची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पण येमुले गुरुच्या सल्ल्यामुळे त्यांच्या संसराचा खेळ खंडोबा झाला.

गणेश नानासाहेब गायकवाड कोण आहे?

गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो. प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत.

पोलिसांच्या तपासात येमुलचं कनेक्शन समोर

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला तेव्हा या प्रकरणातील राजकीय गुरू येमुलचं कनेक्शन समोर आलं. येमुल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढर्‍या पाय गुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे पिडितेचा पती गणेशला सांगितले. त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. यामुळे संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याच्या कारणावरून येमुल गुरूजीस अटक करण्यात आलीय.

येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध

येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध आहेत. आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्नही करीत होते. त्यामुळे या प्रकरणात अंनिसने उडी घेतली असून कारवाईची मागणी केली होती.

संबंधित बातम्या :

कोण आहे राजकीय गुरु रघुनाथ येमूल ज्याला नेत्याच्या बायकोनं कोठडीची हवा खाऊ घातलीय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI