पिंपरी चिंचवड : कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अभिनेते हेमंत बिर्जे (Actor Hemant Birje) आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात (Pune Mumbai Express Way Car Accident) झाला. यामध्ये बिर्जे यांच्यासह त्यांची पत्नी अमना हेमंत बिर्जे आणि कन्या रेश्मा तारिक अली खान यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. तिघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हेमंत बिर्जे यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताच्या वेळी खुद्द हेमंत बिर्जेच कार चालवत होते. औषधाच्या सेवनामुळे त्यांना गाडी चालवताना झोप अनावर झाल्याची माहिती आहे. नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गवरील दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. ‘टारझन’ (Tarzan) या हिंदी चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेते हेमंत बिर्जे लोकप्रिय झाले.