
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. आता पुण्यातून गँगवॉरची घटना समोर आली आहे. नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकरवर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. यात गोविंदचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणात गणेश कोमकरचा हात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता गणेशचा मुलगा गोविंद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार काही हल्लेखोरांनी नाना पेठेत गोविंद कोमकरवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या घटनेत गोविंदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. कारण सध्या शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे, कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ही घटना घडली आहे.
पुण्यातील गजबलेला परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या नाना पेठेमधील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकरांवर हल्ला करण्याआधी त्या परिसरातील लाईट घालवण्यात आली होती. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी ते एकटे असल्याचे पाहून हल्ला केला. वनराज यांच्यावर आधी कोयत्याने वार केले आणि त्यानंतर गोळीबार केला. वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना तिथून हल्लेखोरांनी पळ काढला होता यानंतर वनराज यांचा मृत्यू झाला होता.
पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आसले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक राहिले होते.