स्वस्त सोन्याच्या मोहात पडला अन् 10 लाख गमावून बसला, पुण्यात नेमकं काय घडलं?
भोर तालुक्यात एका धक्कादायक सोनेच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मिरज येथील जयकुमार नरदेकर यांना ३०,००० रुपये प्रति तोळा दराने सोनं देण्याचे आमिष दाखवून १०,५०,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी पुण्यात बोलावून फसवणूक केली. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मिरजमधील एका व्यक्तीला ३० हजार रुपये प्रति तोळा दराने सोनं देण्याचं आमिष दाखवून तब्बल १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जयकुमार बाबासो नरदेकर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
जयकुमार नरदेकर हे मिरज येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तिथेच त्यांची ओळख आरोपी कृष्णा प्रकाश तुपे याच्याशी झाली. याच ओळखीचा फायदा घेऊन तुपेने नरदेकर यांना स्वस्तात सोनं मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. सुरुवातीला त्याने त्यांना १६ जुलै रोजी मध्य प्रदेशातील कटणी येथे नेलं. तिथे बुवा ठाकूर नावाच्या व्यक्तीने ३० हजार रुपये प्रति तोळा दराने सोनं विकत असल्याचं सांगितलं. विश्वास बसावा म्हणून त्यांनी नरदेकर यांना एक ग्रॅम सोन्याचा नमुना दिला. तपासणीमध्ये ते सोनं खरं असल्याचं समोर आल्याने नरदेकर यांचा विश्वास बसला.
यानंतर तुपेने वारंवार फोन करून नरदेकर यांना सोनं घेण्यासाठी गळ घातली. अखेर २ ऑगस्ट रोजी नरदेकर यांनी १० लाख ५० हजार रुपयांचं सोनं घेण्याचा निर्णय घेतला. आरोपींनी त्यांना सोनं देण्यासाठी पुण्यात बोलावलं. सुरुवातीला नरदेकर यांनी नकार दिला. पण तुपेने काही धोका नाही, मी जबाबदार आहे अशी खात्री दिल्याने ते तयार झाले. यानंतर ४ ऑगस्ट रोजी नरदेकर त्यांचे मित्र शिवानंद ज्ञामगौडर आणि दीपक वनसुरे यांच्यासह १० लाख ५० हजार रुपये घेऊन पुण्याला निघाले. शिरवळजवळ आल्यावर तुपेने त्यांना कापूरव्होळ पुलाखाली बोलावले. तिथे त्यांची तुपे आणि राहुल चव्हाण यांच्याशी भेट झाली. त्यानंतर सर्वजण बुवा ठाकूरला भेटण्यासाठी कापूरव्होळ-भोर रस्त्याने पुढे गेले.
ठरल्याप्रमाणे बुवा ठाकूर तिथे हजर होता. त्याने नरदेकर यांच्याकडून पैसे घेतले आणि “मी सोनं घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा” असं सांगितलं. त्यानंतर तो शेतात जाणाऱ्या रस्त्याने आत गेला, पण बराच वेळ झाला तरी परत आला नाही. नरदेकर यांना संशय आला आणि त्यांनी तुपेला विचारणा केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर नरदेकर आणि त्यांच्या मित्रांनी शेतात शोध घेतला, पण त्यांना कुणीही सापडलं नाही.
चार जणांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर नरदेकर यांनी तुपेला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. पण तुपेने त्यांना पोलिसांत गेला तर त्रास होईल अशी धमकी दिली. मात्र, नरदेकर आणि त्यांच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत तुपे आणि राहुल चव्हाण यांना पकडून राजगड पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा प्रकाश तुपे, राहुल चव्हाण, बुवा ठाकूर आणि एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या तुपे आणि चव्हाणला न्यायालयाने शुक्रवार ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
