Kalyan Crime : अडकलेले कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने अदलाबदली केली, मग एटीएम कार्डमधून पैसे लुटले !
एटीएम जेष्ठ नागरिकांना एकटे गाठून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.
कल्याण / 5 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत विविध प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पैसे लुटण्यासाठी चोरटे काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. एटीएममध्ये पैसे काढायला आलेल्या रिक्षा चालकाचा पासवर्ड गुपचूप पाहिला. मग अडकलेले कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने एका रिक्षा चालकाचे कार्ड बदलले. यानंतर एटीएममधून 97 हजार रुपयांची फसवणूक केली. कल्याण शिवाजी चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
काय घडलं नेमकं?
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात राहणारे 65 वर्षीय रिक्षा चालक गुलाम हसन हे बुधवारी दुपारी 3 वाजता कल्याण शिवाजी चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएम मशिनमध्ये टाकलेले कार्ड बाहेर येत नव्हते. ते काढण्यासाठी गुलाम प्रयत्नशील होते. त्याचवेळी त्यांच्या बाजूला एक 35 वर्षाचा तरुण उभा होता. त्याने एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी गुलाम यांनी टाकलेला गुप्त पासवर्ड गुपचूप पाहिला. मग एटीएममधून कार्ड बाहेर येत नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणाने गुलाम यांना काका मी तुमचे अडकलेले एटीएम कार्ड बाहेर काढून देतो असे सांगितले.
एटीएमची अदलाबदल करुन पैस काढले
यानंतर आरोपीने गुलाम यांचे कार्ड काढून दिले. मात्र यावेळी त्याने हातचलाखी करत कार्ड बदलले. त्यानंतर तो पसार झाला. दुसऱ्या एटीएममधून काही क्षणात गुलाम यांच्या बँक खात्यामधून एटीएम कार्डच्या साहाय्याने 97 हजार रुपये भामट्याने काढले. पैसे काढल्याचा मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर गुलाम यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी बँकेत जाऊन खात्री केली. त्यावेळी त्यांच्या खात्यावरुन अन्य एका खात्यावर रक्कम वर्ग झाली होती. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच गुलाम यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भामट्या विरुध्द तक्रार दाखल केली. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.