Rohit Arya Encounter : रोहितच्या छातीत का गोळी मारली? कोर्टात दाद मागणार, कोण आहेत नितीन सातपुते ?
Rohit Arya Encounter : "या प्रकरणातील बऱ्याच गोष्टींच यामी गौतमच्या 'ए थर्सडे' चित्रपटाशी साधर्म्य आहे. या सिनेमात यामी गौतम सरकारी अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी शालेय मुलांना ओलीस ठेवते. रोहित आर्याने सुद्धा स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेऊन काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला"

“राज्य पोलिसांचं अपयश झाकण्यासाठी रोहित आर्याचा एन्काऊंटर करण्यात आला. वरिष्ठांकडून दबाव होता” असा आरोप एडवोकेट नितीन सातपुते यांनी केला आहे. “निष्पाप मुलांचं संरक्षण करण्यात पोलीस दल अपयशी ठरलं. रोहितच्या छातीत का गोळी मारली? शरीराच्या खालच्या भागावर का गोळी चालवली नाही?. 17 अल्पवयीन मुल आणि दोन प्रौढ नागरिकांच्या अपहरणासाठी पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. त्याच्या स्टेटमेंटनुसार राज्य सरकारने मृत रोहित आर्याची 2 कोटींना फसवणूक केली” असा दावा एडवोकेट नितीन सातपुते यांनी केला.
“रोहितने आधी त्याचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला. मग त्याने त्याचं मन बदललं. किडनॅपिंग करायचं त्याने ठरवलं. सरकारकडून त्याचे पैसे येत नसल्याने तो प्रचंड तणावाखाली होता. पोलीस त्याच्या पायावर किंवा शरीराच्या खालच्या भागावर गोळी चालवू शकले असते. मुलांना किडनॅप करुन त्यांचं नुकसान करण्याचा रोहित आर्याचा उद्देश नव्हता. त्याच्या स्टेटमेंटवरुन हे दिसतं. त्याला फक्त राज्य सरकारने त्याचे 2 कोटी रुपये द्यावे, एवढीच त्याची मागणी होती. याआधी रोहित आर्याने उपोषण करुन त्याची थकीत देणी मिळवण्याचा प्रयत्न केला होता” असं एडवोकेट नितीन सातपुते म्हणाले.
त्याला आत्महत्या करुन जीवन संपवायचं होतं
“या प्रकरणातील बऱ्याच गोष्टींच यामी गौतमच्या ‘ए थर्सडे’ चित्रपटाशी साधर्म्य आहे. या सिनेमात यामी गौतम सरकारी अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी शालेय मुलांना ओलीस ठेवते. रोहित आर्याने सुद्धा स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेऊन काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला आत्महत्या करुन जीवन संपवायचं होतं. पण नंतर त्याने त्याच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मुलांना ओलीस ठेवलं. पोलीस हिरो बनतायत. पण या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी याचिका दाखल केल्यानंतर सत्य बाहेर येईल” असं नितीन सातपुते म्हणाले.
काही लोकांचं हिरो बनण्याचं स्वप्न आहे
“सीनियर पी आय जितेंद्र सोनवणे आणि आणखी काही लोकांचं हिरो बनण्याचं स्वप्न आहे. त्यांच्याआधी भरपूर एन्काऊंटर स्पेशलिस्ट होते, सगळे जेल जाऊन आलेले आहेत. मी कोर्टामध्ये जाणार आहे. ज्यांच्या मार्फत एन्काऊंटर झालेला आहे, गुन्हा दाखल करून तपास झाला पाहिजे आणि मंत्री असू द्या कोणीही असू द्या” असं नितीन सातपुते यांनी सांगितलं.
