विना टेस्ट कोरोना रिपोर्ट, सांगली पोलिसांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या

विना टेस्ट बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. Sangli Police fake corona Report racket

  • शंकर देवकुळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 16:12 PM, 4 May 2021
विना टेस्ट कोरोना रिपोर्ट, सांगली पोलिसांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या
बनावट कोरोना रिपोर्ट प्रकरणी अटक

सांगली: विना टेस्ट बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. मिरजेच्या सिनर्जी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याकडून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी स्वप्नील बनसोडे याला अटक करण्यात आली. (Sangli Police Crime Branch arrested on person for fake corona report )

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून भांडाफोड

कोरोनाची गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.असाच एक प्रकार सांगलीच्या मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे. हॉस्पिटल मध्ये आय टी विभागात सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या स्वप्निल बनसोडे कडून विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्यात येत असल्याचा प्रकार सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून उघडकीस आणला आहे.

प्रती रिपोर्ट 500 रुपयांची मागणी

जिल्हा बंदी,राज्य बंदी असल्याने पर जिल्ह्यात आणि राज्यात जाणाऱ्या व्यक्तींच्यासाठी रुग्णांच्यासाठी ई-पाससाठी कोरोना टेस्ट आवश्यक असल्याने अश्या व्यक्तींना विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्याचा उद्योग स्वप्नील बनसोडेकडून सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून रिपोर्ट हवा असल्याची मागणी केली असता,बनसोडे याने प्रती रिपोर्ट 500 रुपयांचा मागणी केली.

2 जणांना रिपोर्ट दिले

पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ,त्याने आता पर्यंत 2 विना टेस्ट कोरोना रिपोर्ट ई-पास आवश्यक असणाऱ्या आणि मयत रुग्णांना देण्यात आल्याची कबुली दिली असुन या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

सांगलीत लॉकडाऊन

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करून या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगलीत ऑक्सिजन काठावर

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

सांगलीत आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; जयंत पाटील म्हणाले, सर्वांचाच जीव महत्त्वाचा

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

(Sangli Police Crime Branch arrested on person for fake corona report )